कराडमध्ये कृष्णा हॉस्पिटलबाबत सोशल मिडियातून अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कोरोनाच्या महाभयंकर साथीमध्येही काही विकृत प्रवृत्ती सोशल मिडियाचा घातक वापर करत, सातत्याने वेगवेगळ्या अफवा पसरवित आहेत. या अफवांमुळे समाजाचे स्वास्थ बिघडत असून, जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे कटकारस्थानही रचले जात आहे. मात्र आता अशा प्रवृत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्याचा निश्चय कराड पोलिसांनी केला आहे. कोरोनाच्या लढाईत जिल्ह्यात आरोग्यसेवा बजाविण्यात अग्रेसर असणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलची सोशल मिडीयातून नाहक बदनामी करणाऱ्या आणि हॉस्पिटलबाबत अफवा पसरविणाऱ्यांबद्दल कराड शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी चौकशीसाठी काही तरुणांना ताब्यात घेतले असून, या तरुणांचे राजकीय ‘कनेक्शन’ही तपासले जात आहे.

आज केवळ कराड तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा देण्यात कृष्णा हॉस्पिटल अग्रेसर आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आज कृष्णा हॉस्पिटल महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. कृष्णा हॉस्पिटलचे अनेक कर्मचारी जीवाची बाजी लावून या संकटाचा सामना करत आहेत. अशावेळी या हॉस्पिटलबाबत सोशल माध्यमातून चुकीच्या अफवा पसरविल्या जात आहेत. इतकेच नव्हे तर या अनुषंगाने व्हायरल करण्यात आलेल्या मॅसेजमधून राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले आणि भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांच्यावर जाणीवपूर्वक गंभीर स्वरूपाची चिखलफेक केली जात आहे. तसेच कोरोना प्रसाराच्या अनुषंगाने आक्षेपार्ह आणि तथ्यहीन विधाने मॅसेजमधून करण्यात आली असून, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाहक भिती पसरण्याची शक्यता आहे.

त्यामुळे याबाबत कराड शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी भा.दं.वि.च्या कलम 399, 500, 505 (2) अन्वये आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाच्या कलम 52 व 54 अन्वये अफवा पसरविणे आणि बदनामी करणेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, चौकशीसाठी काही युवकांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पोलिसांनी कोणत्याही अफवा आणि आक्षेपार्ह माहिती पसरविणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

Leave a Comment