खळबळजनक! पालघर मॉब लिंचिंगप्रकरणी अटकेत असलेले ११ आरोपी कोरोना पॉझिटिव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पालघर । पालघरमधील दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकांच्या मॉब लिंचिंग प्रकरणी अटकेत असलेल्या आणखी ११ आरोपींना कोरोनाने गाठल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पालघर मॉब लिंचिंग प्रकरणात अटकेत असलेल्या या सर्व आरोपींना वाडा पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. दरम्यान, यातील ११ आरोपींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर वाडा पोलीस ठाणे व बाजूलाच असलेले तहसीलदार कार्यालय २ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सविस्तर माहितीनुसार, साधूंच्या मॉब लिंचिंग प्रकरणी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावातील किमान २३ आरोपींना वाडा पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. यापैकी ११ आरोपींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर आणखी ६ आरोपींचे स्वॅब तपासणीसाठी देण्यात आले असून त्याचा चाचणी अहवाल अद्याप आलेला नाही.

दरम्यान, ११ आरोपींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर या आरोपींच्या संपर्कात आलेल्या पोलिसांच्याही आता चाचण्या करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. खबरदारी म्हणून वाडा पोलीस ठाणे २ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाडा पोलीस ठाण्याला लागूनच तहसीलदार कार्यालय असून ते कार्यालयही दोन दिवस बंद राहणार आहे. या हत्याकांडातील एका आरोपीचा कोरोना चाचणी अहवाल २ मे रोजी पॉझिटिव्ह आला होता. वाडा भागात सापडलेला हा कोरोनाचा पहिला रुग्ण ठरला होता. आता आणखी ११ आरोपांना कोरोनाची लागण झाल्याने वाडा शहरात सगळेच हादरले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.

Leave a Comment