इंदुरीकर महाराज हाजीर हो! कोर्टाने बजावलं समन्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर । प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज अर्थात निवृत्ती महाराज देशमुख यांनी त्यांच्या किर्तनात एक दावा केला होता जो त्यांना चांगलाच भोवला आहे. संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवर संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून इंदुरीकर महाराजांना कोर्टाने त्यांना समन्स बजावलं आहे. त्यानुसार त्यांना ७ ऑगस्टला कोर्टात हजेरी लावावी लागणार आहे.

इंदुरीकर महाराजांची एक व्हिडीओ क्लीप व्हायरल झाली. या व्हिडीओ क्लीपमध्ये  “सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते” असा दावा इंदुरीकर महाराजांनी केला होता. या वक्तव्यावरुन फेब्रुवारी महिन्यात मोठा वाद झाला होता. याच वक्तव्यावरून संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवर इंदुरीकर महाराजांवर PCPNDT कायद्याच्या कलाम २२ चं उल्लंघन केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.

यानंतर अहमदनगर येथील PCPNDT च्या सल्लागार समितीच्या सदस्यांनी त्यांना नोटीसही पाठवली होती. त्या नोटीशीला इंदुरीकर महाराज यांनी आपल्या वकिलांमार्फत बाजू मांडत उत्तर दिलं होतं. याशिवाय सामाजिक कार्यकर्त्या रंजना गावंदे यांनी प्रशासनाला नोटीस बजावली होती. यात त्यांनी प्रशासनाने गुन्हा दाखल न केल्यास तुम्हालाही दोषी धरण्यात येईल, असंही म्हटले होते. त्यानंतर इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाला. आता त्यांना कोर्टाने समन्स बजावलं असून ७ ऑगस्ट रोजी या प्रकरणी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आता कोर्टात इंदुरीकर महाराज नेमकी काय बाजू मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment