सातारा कारागृहात धारदार कटर आणि चिठ्ठी आढळली, अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा येथील जिल्हा कारागृहात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास एका अज्ञाताकडून चायनीज धारदार कटर आणि चिठ्ठी टाकण्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं कारागृह सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास कारागृहातील सर्कल नंबर २ च्या पाठीमागे असलेल्या कैद्याच्या अंघोळी शेडच्या पत्र्यावर कोणीतरी काहीतरी टाकल्याचा आवाज आला. त्यामुळे तेथील पोलीस रक्षक कशाचा आवाज आला आहे? ते पाहण्यासाठी गेले असता त्यांना त्याठिकाणी खाकी रंगाच्या कागदात काहीतरी गुंडाळल्याचे दिसून आले. दरम्यान तपासणी केली असता प्लास्टिकच्या कागदात चायनीज चिकन राईस, एक पांढऱ्या रंगाचा धारदार कटर आणि एक चिठ्ठी आढळून आली.

कारागृहात आढळलेल्या या चिठ्ठीत बाबा, १३/१२ ला काम झाले पाहिजे, असा मजकूर होता. तसेच या मजकुराच्या डाव्या बाजूस वर्तुळात टीजी ही अक्षरे होती. तर कारागृहात हा प्रकार समोर आल्यानंतर संबंधितांनी कारागृह अधीक्षकांना याची माहिती दिली. त्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात हवालदार दौलत खिलारे यांनी अज्ञाताच्या विरोधात तक्रार दिली आहे. तरी पोलिसांनी या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Comment