उन्नाव मध्येहैदराबादची पुनरावृत्ती; बलात्कार पीडितेला पेटून देण्याचा प्रयत्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । हैद्राबाद मध्ये झालेल्या निर्भया कांडाला काही दिवस होत नाहीत तोवर दुसरी  एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हैद्राबाद प्रमाणेच उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे सामूहिक बलात्कार पीडितेला मारहाण करत जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने ज्या सहा जणांवर बलात्काराचा आरोप केला आहे, त्यांनीच महिलेवर हल्ला करत हे कृत्य केलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता आज (गुरुवारी) पहाटे चार वाजता रायबरेलीला जाण्यासाठी बैसवारा बिहार रेल्वे स्थानकात जात असताना हा प्रकार घडला आहे. गौरा फाटय़ावर गावातील हरिशंकर त्रिवेदी, किशोर शुभम, शिवम, उमेश यांनी पीडितेला रस्त्यात अडवत तिच्यावर चाकूने हल्ला केला असून, त्यानंतर तिच्यावर केरोसिन टाकून जिवंत जाळलं आणि घटनास्थळावरून पळ काढला आहे. या घटनेतरील पीडितेला उन्नाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर पुढील उपचारासाठी कानपूर येथील एलएलआर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, एकूण सहा जणांनी मिळून हल्ला केला. यावेळी तिच्या डोक्यावर आणि गळय़ावर चाकूने वार करण्यात आले. पीडित तरुणी जमिनीवर पडली असता तिच्यावर केरोसिन टाकून जाळण्यात आलं. पीडितेला जाळल्यानंतर तिचा आरडाओरड ऐकून लोक धावून येत असल्याचे पाहून आरोपींनी तेथून पळ काढला होता.

दरम्यान यापूर्वी याच सहा जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे पीडितेने सांगितले. या घटनेची माहिती मिळताच डीएम देवेंद्र पांडे, एसपी विक्रांत वीर यांच्यासह अनेक पोलिस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पीडितेने ५ आरोपींची नावे दिली आहेत. यातील तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तिघांचीही चौकशी केली जात आहे. इतर दोघांचा शोध सुरू आहे, अशी माहिती उन्नावच्या पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

Leave a Comment