भावकीतील लोकांना क्वारंटाइन केल्यामुळे महिला सरपंचाला मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परजिल्ह्यातून आपल्या गावात येणाऱ्या व्यक्तींना क्वारंटाइन ठेवण्यात येत आहे. शासनाच्या आदेशानुसारच ही कार्यवाही होत असली तरी ग्रामीण भागात यावरून तंटे सुरू झाले आहेत. अशीच एक घटना नगर जिल्ह्यात समोर आली आहे. भावकीतील लोकांना क्वारंटाइन केल्यामुळे दोन जणांनी महिला सरपंचाला मारहाण केली आहे. कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात येथे काल रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनमध्ये युवराज पांडुरंग आखाडे व बाळासाहेब रामा वाघमारे (दोघे रा.चिंचोली काळदाता, कर्जत) या दोघांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास संबंधित महिला सरपंच या स्वतःच्या घरातून सांडपाणी बाहेर टाकण्यासाठी आलेल्या असताना आरोपी युवराज आखाडे व बाळासाहेब वाघमारे तेथे आले व ‘तू जाणीवपूर्वक आमच्या भावकीतील लोकांना मिरजगाव येथे क्वारंटाइन केले आहे,’ असे सरपंचाला म्हणाले. यावेळी ‘कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारचे तसेच आदेश आहेत,’ असे सरपंच यांनी आखाडे व वाघमारे यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, युवराज आखाडे व बाळासाहेब वाघमारे यांनी संबंधित महिला सरपंचाला मारहाण करण्यास सुरुवात केली. या महिलेचा पती सोडवण्यासाठी मध्ये गेला असता, त्यालाही आरोपींनी मारहाण केली आहे. याप्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यामध्ये परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात येत आहे. ग्रामीण भागात यासाठी समितीही स्थापन करण्यात आली असून या समितीमध्ये गावच्या सरपंचाचा सुद्धा समावेश आहे. मात्र, ग्रामीण भागात बाहेरून येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाइन करताना वाद उद्भवू लागले असून मारहाणीचे प्रकारही घडू लागले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment