ईडीच्या दिरंगाईमुळं येस बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी वाधवान बंधूंना मिळाला जामीन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । येस बँक घोटाळ्यात मनी लाॅंडरिंगच्या आरोपाखाली अटकेत असलेले मुख्य आरोपी असलेले दिवाण हौन्सिंग फायनान्सचे प्रवर्तक कपील वाधवान आणि धीरज वाधवान यांना आज अखेर जामीन मिळाला आहे. सक्तवसुली संचनालयाला (ईडी) वाधवान बंधूविरोधात हायकोर्टात पुरवणी आरोपपत्र सादर करण्यास एक दिवसाची दिरंगाई केल्यानं त्याचा फायदा वाधवान बंधूना मिळाला. हायकोर्टाने तांत्रिक कारणाच्या आधारे त्यांना जामीन मंजुर केला आहे. तब्बल ३ महिन्यांनंतर वाधवान बंधूंना किंचिंतसा दिलासा मिळाला तरीही त्यांची तुरुंगातून सुटका होणार नाही. कारण सीबीआयच्या एका प्रकरणात त्यांना तुरुंगामध्येच रहावे लागणार आहे. सध्या दोघे हे बंधू तळोजा येथील तुरुंगात आहेत.

वाधवान बंधूंविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी हायकोर्टाने ईडीला ६० दिवसांची मुदत दिली होती. ईडीकडून १३ जुलै रोजी आरोप पत्र कोर्टात दाखल केले. मात्र ६० दिवसांची मुदत १२ जुलै रोजी पूर्ण झाली असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले. त्यामुळे तांत्रिक कारणास्तव वाधवान बंधूना कोर्टाने जामीन मंजुर केला. मात्र वाधवान बंधूसाठी हा आंनद अल्पजीवी ठरला. कारण सीबीआयच्या एका प्रकरणात त्यांना तुरुंगातच रहावे लागणार आहे.

येस बँकेच्या ३७०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आणि ईडीकडून तपास केला जात आहे. दिवाण हौसिंग फायनान्सने येस बँकेचे ७५० कोटींचे कर्ज बुडवले आहे. हे कर्ज मंजूर करताना बँकेवर राणा कपूर यांचे नियंत्रण होते. त्यामुळे राणा कपूर यांनी देखील यातून फायदा मिळवला आहे, असे तपासात आढळून आले आहे. दरम्यान, येस बँक घोटाळ्यात मनी लाॅंडरिंगच्या आरोपाखाली १५ मे रोजी कपील वाधवान आणि धीरज वाधवान याना ईडी कडून अटक करण्यात आली होती. याच प्रकरणी येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना देखील ईडीने अटक केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment