सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
सातारा शहरातील मंगळवार पेठेत असणाऱ्या जागेत खोदकाम करत जमिनीचे नुकसान केल्याप्रकरणी शाहुपूरी पोलिस ठाण्यात सातारा पालिकेतील आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नगरसेवक रविंद्र निवृत्ती ढोणे (वय- 43, रा.रामाचा गोट, सातारा) यांच्यासह तीन जणांवर ॲट्रासिटीतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा शहरातील मंगळवार पेठेत विक्रांत बाळकृष्ण दुबळे हे राहण्यास असून त्यांची त्याच परिसरात वडिलोपार्जित जागा आहे. श्री. दुबळे यांच्या वडिलोपार्जित जागेत संभाजी वायदंडे, पुष्पा संभाजी वायदंडे यांनी ती जागा स्वत:ची असल्याचा दावा करत वाद घालत दमदाटी केली. याबाबतची अदखलपात्र तक्रार दि. 4 रोजी शाहूपुरी पोलिस ठाण्यात केली होती. काल विक्रांत दुबळे यांच्या वडिलोपार्जित जागेत खुदाई केल्याचे तसेच त्याठिकाणी संभाजी वायदंडे, पुष्पा वायदंडे, रविंद्र ढोणे हे उभे असल्याचे दिसले. वडिलोपार्जित जागेत खुदाई करत जमिनीचे नुकसान केल्याची तक्रार काल (शुक्रवारी) विक्रांत दुबळे यांनी शाहुपूरी पोलिस ठाण्यात नोंदवली.
यात त्यांनी संभाजी वायदंडे, पुष्पा वायदंडे यांच्याशी संगनमत करत नगरसेवक रविंद्र ढोणे यांनी मी मागासवर्गीय असल्याचे माहित असूनही माझ्या मालकीच्या मोकळ्या जागेत खुदाई करत नुकसान केल्याचे नमुद केले आहे. यानुसार रविंद्र ढोणे, संभजी वायदंडे, पुष्पा वायदंडे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास अतिरिक्त पोलिस अधीक्षक आंचल दलाल या करीत आहेत.