सिगरेट चोरण्यासाठी पानटपरीवर डल्ला मारणारा चोर कोरोना पॉजिटीव्ह, पोलिसांसह २४ जण क्वारंटाईन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । लॉकडाउनमुळे व्यसनी लोकांची चांगलीच फजिती झाली आहे. अशात अनेक ठिकाणी दारूच्या दुकानांमध्ये चोरी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र मुंबईत घडलेल्या अशा एका चोरीमुळे पोलिसांसह, कोर्टाच्या २४ जणांना क्वारंटाईन करावे लागले आहे. सिगरेट करण्यासाठी पाणटपरीवर डल्ला मारणारा चोर कोरोना पॉजिटीव्ह निघाल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, सदर २४ वर्षीय तरुण गोरेगाव पश्चिमेला राहतो. त्याच्यावर चोरीचे अनेक छोटेमोठे गुन्हे दाखल आहेत. २० एप्रिल रोजी तो आणि त्याचे दोन मित्र जवळच्याच एका पानटपरीतून सिगारेट चोरण्यासाठी गेले होते. या तिघांनी पानटपरीवाल्यावर चाकूचा हल्ला करून त्याच्याकडील ३५०० रुपयांची रोकड पळवून फरार झाले. हे तिघांनी लूट केल्यानंतर पानटपरीवाल्याने बोंबाबोंब केल्याने दुसऱ्या दुकानदारांनी आणि रस्त्यावरून जाणाऱ्यांनी या तिघांना पकडून पोलिसांच्या हवाली केले होते. पानटपरीवाल्याच्या तक्रारीनंतर या चोराविरोधात बांगुरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दुसऱ्या दिवशी त्याला बोरिवलीच्या न्याय दंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्यात आले. तेव्हा त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली. तळोजा तुरुंगात त्याला आणले असता त्याची करोना टेस्ट झाली नसल्याने तुरुंगाधिकाऱ्याने त्याला तुरुंगात घेण्यास मनाई केली. त्यानंतर पोलिसांनी त्याची करोना टेस्ट केली असता त्याला करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं. त्यामुळे त्याला १४ दिवसांसाठी क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. दरम्यान, त्याला करोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट आल्यानंतर पोलिसांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. तो रात्रभर पोलीस कोठडीत होता. त्यामुळे या पोलिस ठाण्यातील पोलीस आणि कोठडीतील कैद्यांसह कोर्टातील दोन स्टाफ आदी २४ जणांना क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे.

Leave a Comment