नरभक्षक बबला गँगच्या सदस्याचा दगडाने ठेचून खून; मध्यरात्रीच्या घटनेने खळबळ

औरंगाबाद : कडाक्याचे भांडण झाल्याच्या कारणावरुन नरभक्षक बबला गँगच्या सदस्याचा २८ मे रोजी मध्यरात्री दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली. बारापुला नाल्यात (खामनदी) त्याचा मृतदेह आढळून आला. शेख माजीद उर्फ मुर्गी शेख अली (२८, रा. शासकीय रुग्णालयाजवळ, खडकेश्वर) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, दगडाने ठेचून खून केल्याची पंधरा दिवसातील ही तिसरी घटना आहे. विशेष म्हणजे गँगवॉरमधून वाळुज एमआयडीसीतील बजाजनगरात दगडाने ठेचून कुख्यात गुन्हेगाराचा खून केल्याची घटना ताजी आहे. असे असतानाच पुन्हा एकदा गँगवॉरमधून घटना घडल्याचे समोर येत आहे.

छावणी पोलिसांनी सांगितले की, शेख माजिद हा मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असे. त्याला एक अपत्य आहे. त्याचा लहान भाऊ सौदी अरेबियात नोकरीला आहे. शुक्रवारी रात्री दहा ते दीड वाजेच्या सुमारास माजीद घराबाहेर पडला त्यानंतर तो घरी परतला नाही. मिलिंद कॉलेजच्या स्टेडियम मागील भागात झाडी आणि खाम नदी आहे. तेथे माजिदचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा माजिदचे डोके दगडाने ठेचून त्याचा खून केल्याचे दिसले. त्याच्या अंगावर केवळ पेंट होती. मारेकऱ्यांसोबत झालेल्या झटापटीत त्याचा शर्ट फाटला असेल, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला. बारापुल्ला गेट जवळील खाम नदी पात्रात त्याचा खून झाला.

घटनास्थळापासून बऱ्याच अंतरावर राहणाऱ्या कुटुंबाने खाम नदीत शुक्रवारी रात्री भांडणाचा आवाज ऐकला होता मात्र आम्ही आवाजाकडे दुर्लक्ष केले होते असे सांगितले. घटनेची माहिती मिळताच माजिदचे वडील, नातेवाईक, मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. माजिद च्या वडिलांचे माझ्या मुलाचा खून करणार्‍या आरोपींना पकडा असे म्हणत टाहो फोडला.

सन २०१४ मध्ये शेख वाजीद उर्फ बबला याच्या गँगने शहरात धुमाकूळ घातला होता. त्यानंतर देखील बबलाने १६ मे २०१८ रोजी प्लॉटींगच्या वादातून प्लंबर शेख जब्बार शेख गफ्फार यांचे साथीदारांच्या मदतीने अपहरण करुन हत्या केली होती. या बबलाच्या गँगमध्ये मयत शेख माजीद उर्फ मुर्गी हा सन २०१४ पासून सक्रिय झाला होता. त्यावेळी बबलाचा आरेफ कॉलनीतील एकाशी वाद झाला होता. या भांडणात मजाज लीडर याने मध्यस्थीसाठी प्रयत्न केला. तसेच मजाज लीडर हा पोलिसांचा खबरी असल्याचा संशय बबलाला होता. त्यामुळे त्याचा मजाज लीडरवर राग होता. त्याचदिवशी बबला व त्याच्या साथीदाराने मजाज लीडरला हिमायतबागेत नेले होते. तेथे हातपाय बांधून मारहाण केल्यानंतर मजाज लीडरच्या डोक्यात दगड घातला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह हिमायतबागच्या नाल्यात पुरून ठेवला होता. मजाज लीडरला बबला व त्याच्या गँगने सोबत नेल्याचे एकाने पाहिले होते. मजाज लीडर गायब झाल्याचे पाहून त्याने बबलाने खून केल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यातून बेगमपुरा पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्या पथकाने बबला व त्याच्या साथीदारांना अटक केली होती. त्यात माजीद उर्फ मुर्गी याचा देखील समावेश होता. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. पाच वर्षांपुर्वी याप्रकरणातून माजीद उर्फ मुर्गी याची जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर त्याने मजूरीचे काम सुरू केले होते.

नशेखोर गँगचा नाल्यांमध्ये वावर

मध्यवर्ती बसस्थानकासमोरील परिसरात रईस बोक्या, अनिस बोक्या, चांद पाशा, वसीम यांच्यासह अन्य गुन्हेगारांचा वावर असायचा. त्यापैकी रईस बोक्या हा सध्या हर्सुल कारागृहात आहे. सध्या नव्याने नशेखोर गुन्हेगारांची गँग शहरात वावरत आहे. ही गँग गरम पाणी, बारापुला ते पानचक्की या नाल्यात वावरते. त्याचठिकाणी ही गँग नशा करण्यासाठी फिरत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नशेतून झालेल्या भांडणानंतर माजीद उर्फ मुर्गीचा खून झाल्याचा अंदाजही सूत्रांनी वर्तवला.

भांडणातून खून झाल्याची पित्याची माहिती

मयत माजीद उर्फ मुर्गी हा विवाहित आहे. त्याला एक मुलगा असून, भाऊ दुबईमध्ये नोकरीला आहे. तर त्याचे वडील मजूरीचे काम करतात. २८ मे रोजी रात्री आठ ते नऊच्या सुमारास माजीद उर्फ मुर्गी हा मिल कॉर्नर येथील एका हॉटेलात शिरताना त्याचे वडील शेख अली यांनी पाहिले होते. त्यानंतर रात्री बाराच्या सुमारास माजीद उर्फ मुर्गी हा नशेतच घरी गेला. आपले हॉटेलात भांडण झाल्याचे सांगत त्याने वडीलांकडून शंभर रुपये घेतले. त्यावेळी माजीद उर्फ मुर्गी याच्याकडे चाकु होता अशी माहितीही त्याच्या वडीलांनी दिली. त्यानंतर आज दुपारी थेट त्याचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे त्याचा वाद नक्की कोणासोबत झाला होता. याची माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, त्याच्या मृतदेहाजवळ मोबाईल, अंगठी आणि गॅरेजमधील एक पान्हा आढळून आला. त्याच्या मोबाईलमधील क्रमांकावरुन गुन्हेगारांचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेनंतर सहायक पोलीस आयुक्त विवेक सराफ, पोलीस निरीक्षक मनोज पगारे, उपनिरीक्षक सचिन वायाळ, पोलीस नाईक अशोक नागरगोजे, शिपाई सिध्दार्थ थोरात व अन्य पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी फॉरेन्सिक लॅब व श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. श्वान स्विटीने मारेक-यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त देईपर्यंत सुरू होती.

शाहरुख खानचा मित्र

पाथर्डी तालुक्यातील विकलांग विद्यार्थी विकास देवचंद चव्हाण (रा. अल्हनवाडी) हा बँकेची परीक्षा देण्यासाठी शहरात आला होता. त्याला परीक्षा केंद्रावर सोडण्याचे आमिष दाखवून लुटण्याच्या उद्देशाने शाहरुख खान फेरोज खान (२८, रा. जूना बाजार) याने महानगर पालिकेजवळील कब्रस्तानात नेले होते. तेथे त्याचा हात कापून शाहरुख खानने हत्या केली होती. हा प्रकार ९ एप्रिल रोजी उघडकीस आला होता. त्या शाहरुखचा देखील मयत माजीद उर्फ मुर्गी हा मित्र असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

औरंगाबादसह देश विदेशातील ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 8080713142 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा HELLONEWS