कराड | व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने व युवकमित्र बंडातात्या कराडकर यांच्या प्रेरणेने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सोमवारी (दि. 6) कराड ते क्रांतिसिंह नाना पाटील यांची जन्मभूमी येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) पर्यंत भव्य सायकल रॅली होणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.
कराड येथील (स्व.) यशवंतराव चव्हाण समाधी स्थळ ते येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जन्मभूमीपर्यंत रॅलीचा मार्ग असणार आहे. रॅली चे ठिकठिकाणी स्वागत केले जाणार आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता (स्व.) यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळावर आगमन व प्रार्थना होईल. नंतर राज्याचे सहकार मंत्री तथा पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते पुण्यसलिला कृष्णामाईचे पूजन होईल. व तहसिलदार किशोर पवार यांच्या हस्ते समाधी स्थळ पूजन व क्रांतिकारकांच्या स्मुर्तीस अभिवादन केल्यानंतर रॅलीस सुरुवात होईल.
कराडवरून ही रॅली कार्वे, वडगाव हवेली, शेरे स्टेशन, शेणोली व लवणमाची मार्गे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जन्मभूमीत आल्यानंतर तेथे नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन होईल. त्यानंतर युवकमित्र बंडातात्या कराडकर यांच्या प्रबोधनाने रॅलीची सांगता होणार आहे.