दरेकरांच्या मुंबै बँकेची चौकशी सुडबुद्धीने नाही; सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सहकार विभागाने प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै बँक कथित गैरव्यवहार प्रकरणी सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ३ महिन्यांत यासंदर्भातला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असून जिल्हा उपनिबंधक प्रताप पाटील यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर प्रवीण दरेकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. ज्या बँकेला ऑडिटरने A ग्रेड दिली आहे, अशा बँकेची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने का घेतला आहे, असा सवाल आज प्रवीण दरेकर यांनी केला होता. त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिलं आहे.

सहकार विभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार ही चौकशी करण्यात येत आहे, असं स्पष्ट करत यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही, असं बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं. सहकार विभागाकडे अनेक तक्रारी येत असतात. अशीच एक तक्रार मुंबई बँके संदर्भात आली होती. यावर जी चौकशी समिती गठित करण्यात आली होती तिने जो अहवाल दिला त्या अनुषंगाने राज्याच्या सहकार विभागाने ही कारवाई केली आहे. असे बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.

दरेकरांचा राष्ट्रवादीला इशारा

दरम्यान, आता याप्रकरणी प्रवीण दरेकर देखील आक्रमक झाले असून महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या सगळ्या जिल्हा बँकांच्याविरोधात मी ईडी, सीबीआय आणि केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हणत एकप्रकारे राष्ट्रवादीला इशारा दिला आहे.

You might also like