DCC Bank : आ. शिवेंद्रराजेंचा पत्ता कटचे कारण आ. शशिकांत शिंदे की पक्ष?

सातारा प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणूक लागल्यापासून अर्ज भरणे, माघार घेणे, बिनविरोध करणे, मतदान करणे, निकाल लागण्यापासून आज 6 डिसेंबर रोजीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनेक ट्विस्ट निर्माण झाले किंवा केले म्हणा. परंतु यामध्ये सर्वात मोठा धक्का हा आ. शिवेंद्रसिंहराजेंना एका रात्रीत अध्यक्ष पदाचा पत्ता कट करून दिला आहे. यामध्ये आ. शशिकांत शिंदेंचा हात म्हणायचा की पक्ष याबाबत हे शरद पवारच सांगू शकतील. मात्र. आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्ष पदावरून पत्ता कट झाल्याने चर्चांना उधाण आले असून तर्कवितर्क बांधले जात आहे.

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सर्वसामावेश पॅनेल उभारण्यापासून सुरूवात झाली. या सहकार पॅनेलमध्ये काॅंग्रेस व शिवसेनेला डावलण्यात आले. तर राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलमध्ये भाजपचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, छ. उदयनराजे भोसले आणि आज उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडूण आलेले अनिल देसाई हे तिघेही बिनविरोध संचालक झाले. अशावेळी भाजपचे माढा मतदार संघाचे खा. रणजिंतसिंह नाईक- निंबाळकर आणि आ. जयकुमार गोरे यांनी या पॅनेलच्या विरोधात पर्यायी पॅनेल देणार असल्याची घोषणाही केली. अर्ज दाखल करण्याच्या दिवशी माजी आ. प्रभाकर घार्गे यांचा अर्ज दाखल करण्यावरून मोठ्या घडामोडी घडल्या. त्यानंतर अर्ज माघारीच्या दिवशी तब्बल 8 जण बिनविरोध झाले. परंतु यामध्ये राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आ. शशिकांत शिंदे याचा समावेश नव्हता. कारण आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे विश्वासू ज्ञानदेव रांजणे यांनी शशिकांत शिंदे यांच्या विरोधातील अर्ज माघारी घेतला नाही. या जागेवरून मोठा गदारोळ झाला. अखेर आ. शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला.

आ. शशिकांत शिंदे यांचा पराभव हा शरद पवार यांच्या जिव्हारी लागल्याने ते निकालच्या दिवशी रात्री थेट साताऱ्यात दाखल झाले होते. रात्रीत बरीच खलबते झाली, निवडणुकीचा ऊहापोहही करण्यात आला. त्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे आणि आ. शशिकांत शिंदे यांनी एकमेकांना आव्हानही दिले.

आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दोन दिवसापूर्वी सिल्वर अोक याठिकाणी शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटी घेवून अध्यक्षपदाबाबत बोलणेही केले. दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची मागणीही केली. शरद पवार यांनी शिवेंद्रराजेंचे काैतुक केले. दोन्ही पवारांनी आ. शिवेंद्रराजेंच्या नावाला अनकुलताही दाखवली. मग काल रात्रीपर्यंत अध्यक्षपदाची माळ आ. शिवेंद्रराजेंच्या गळ्यात पडणार होती. मात्र आज सकाळी ती नितिन पाटील यांच्या गळ्यात कशी गेली ? याबाबत जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या चर्चांनी वेग घेतला असून तर्कवितर्क लढविले जात आहे.

जिल्हा बॅंकेच्या अध्यक्ष पदाबाबत पहायला गेले तर आ. शिवेंद्रसिंहाराजे हे सध्या भाजपचे आमदार आहेत. तसेच त्यांना अध्यक्षपद हे भाजपच्या आमदाराला देणे म्हणजे भाजपाला दिल्यासारखे झाले असते. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष म्हणून अध्यक्षपद राहिले नसते. राजकारणात भविष्यात काय होईल, हे कधीच कुणाला माहिती नसते, याबाबत शरद पवारांना सांगण्याची गरज नाही हे सर्वश्रुत आहे. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे पक्ष त्यामुळे इतर पक्षात अध्यक्षपद देणे शरद पवारांना कदाचित मान्य नसावे. तसेच सर्वात महत्वाचे आता खुले आव्हान दिले आहे, तर आ. शशिकांत शिंदे हे सुध्दा पवारांच्याकडे अध्यक्ष पदावर आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या नावाला विरोध करूच शकतात. आ. मकरंद पाटील हे सुध्दा आपल्या भावाला अध्यक्षपद मिळते म्हणजे ते सुध्दा नितिन पाटील यांच्याच नावाला पसंती देणार हे निश्चित आहे. त्यामुळे आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा पत्ता कट होण्यामागे आ. शशिकांत शिंदे की ते भारतीय जनता पक्षात असल्याने झाला. याबाबत खरे तर खुद्द शरद पवारच सांगू शकतील बाकी आपण नुकतेच अंदाज बांधायचे हेही खरे.

You might also like