धक्कादायक ! विहिरीत आढळला विवाहितेचा मृतदेह, सहा महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

अहमदनगर : हॅलो महाराष्ट्र – कोपरगाव तालुक्यामधील पढेगाव या भागातील एका विहिरीत विवाहितेचा मृतदेह आढळल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या मृत तरुणीचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. या प्रकरणी त्या तरुणीच्या माहेरच्यांनी मात्र सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर पोलिसांकडून सर्व बाजुंनी तपास करण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण
मृत तरुणीचे नाव पुजा सागर मापारी असून ती 24 वर्षांची होती. गुरुवारी सकाळी या तरुणीचा मृतदेह कोपरगाव तालुक्यातील पढेगाव परिसरात असलेल्या विहिरीत आढळून आला होता. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पूजाचे लग्न सहा महिन्यांपूर्वीच झाले होते. पण तिच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे पूजाने आत्महत्या केली असल्याच्या चर्चांना उधाण आले असताना तिच्या माहेरच्यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. याउलट त्यानी पुजाच्या सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात कोणतंही पत्र, चिठ्ठी आढळलेली नाही.

सहा महिन्यांपूर्वी पुजा हिचा विवाह झाला होता. पण तिच्या सासरच्या लोकांनी वारंवार पैशाची मागणी केल्याचा आरोप पुजाच्या माहेरच्या लोकांकडून करण्यात येत आहे. पैशाच्या मागणीवरून पूजाचा अनेकदा मानसिक आणि शरीरिक छळ झाल्याची तक्रार माहेरच्या लोकांकडून करण्यात आली आहे. आमच्या मुलीने आत्महत्या केली नसुन तिचा घातपात केल्याचा आरोप माहेरच्या लोकांकडून करण्यात आला आहे. तसेच आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. मृत्यू नेमका कसा झाला, आत्महत्या आहे की घातपात याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलत जाधव करत आहेत.

You might also like