परमिट घेऊन विद्युत खांबावर दुरुस्तीसाठी चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; संतप्त जमावाकडून रस्तारोको

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी |

परमिट घेऊन विद्युत खांबावर दुरुस्तीसाठी चढलेल्या युवकाला अचानक आलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याने खांबावरून पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरात असणाऱ्या एकता नगर मध्ये घडली. याप्रकरणी सदरील युवकाच्या कुटुंबीयांना महावितरण कडून नुकसान भरपाई मिळावी यामागणीसाठी रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मृत युवकाचा मृतदेह राष्ट्रीय महामार्गावर पाथरी पोलीस स्टेशन समोर ठेवण्यात आल्याने शहरातील सेंट्रल नाका परिसरामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या .

अखिल अब्दुल रहमान अन्सारी उर्फ बडेमिया वय 25 असे विद्युत प्रवाहाचा धक्का बसून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदरील मृत युवक मागील अनेक महिन्यांपासून पाथरी महावितरण कार्यालयांतर्गत शहरात विद्युत खांबावरील जोडणी दुरुस्ती अशा प्रकारचे कंत्राटी काम करत होता. शनिवारी संध्याकाळी दहा वाजण्याच्या सुमारास महावितरणचा लाईनमन व अखिल अन्सारी हे एकता नगर परिसरामध्ये परमिट घेऊन विद्युत खांबावर चढला होता. परंतु यावेळी अचानक सदरील विद्युत खांबावरील तारांमध्ये विद्युत प्रवाह आल्याने हा युवक खांबावरून फेकला गेला. यावेळी त्याला ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारासाठी नेले असता मृत घोषित करण्यात आले. दरम्यान रविवार 23 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सदरील युवकाचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर सेंट्रल नाका येथे ठेवण्यात आला. यावेळी मृत युवकाच्या कुटुंबाला महावितरण कडून नुकसान भरपाई मिळावी अशी जमावाची मागणी होती. घटनास्थळी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनीही भेट देत महावितरणने मृत युवकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोमवंशी ,पोउनि गणेश कराड , सपोउनि गौस ,पोना . सुरेश कदम ,पोना पिंपळपल्ले , पोना.सुरेश वाघ आधी पोलीस कर्मचारी जमावाची समजूत घालत होते. दरम्यान यावेळी महावितरणचे अभियंता शेंबाळे यांनी नुकसानभरपाई देण्यासंदर्भात शब्द दिल्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू झाली होती .

दरम्यान या सर्व प्रकरणांमध्ये महावितरण नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करत असल्याचे पुढे आले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सदरील युवक हा त्यांच्याकडे कंत्राटी कर्मचारी म्हणून कामावर नव्हता .परंतु असे असेल तर मागील अनेक महिन्यापासून तो महावितरण मधील दुरुस्तीचे काम कसे करत होता ? हा प्रश्न निर्माण होतो. .मिळालेल्या माहितीनुसार पाथरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये महावितरण कडून नियुक्त करण्यात आलेले लाईनमन हे प्रत्यक्ष गावात विद्युत पुरवठा दुरुस्ती करताना कुशल असणाऱ्या व्यक्तींना हाताशी धरून कामे करून घेतात.तर बऱ्याच ठिकाणी आयटीआय कोर्स केलेल्या व्यक्तीचे कागदपत्रे महावितरण कडे जमा करत दुसराच व्यक्ती ही कुशल कामे करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली आहे. त्यामुळे भविष्यातही अशी घटना घडली तर महावितरण तो आमचा कर्मचारी नव्हता असे म्हणून अंग झटकणार आहे .परंतु यामध्ये अखिल सारख्या युवकाचा नाहक जीव जाणार आहे. त्यामुळे तालुक्यात आणखी असे किती युवक महावितरण कडून राबविले जातात ही माहिती उघड होणे महत्त्वाचे आहे व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे.

Leave a Comment