दिल्ली हिंसाचार: ‘त्या’ जवानाचे घर आता BSF बांधणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली हिंसाचारात अनेकांच्या घरांना दंगेखोरांनी आगीच्या हवाली केलं. या हिंसाचाराच्या आगीत देशाच्या सीमेवर तैनात बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या एका जवानाचे घर सुद्धा भस्मसात करण्यात आलं. ही वार्ता प्रसार माध्यामाकडून समजताच बीएसएफने या जवानाला मदत करण्यासाठी आता पुढाकार घेतला आहे. ईशान्य दिल्लीत खास खजुरी गली परिसरात मोहम्मद अनिस या बीएसएफ जवानाचे घर होते. दरम्यान, उफाळलेल्या हिंसाचारात हिंसक झालेल्या जमावाने अनिसचे घर पेटवून दिले. या घटनेची माहिती बीएसएफच्या अधिकाऱ्यांना बातम्यांमधून मिळताच अनिसला मदत देण्यासाठी बीएसएफकडून मोहम्मद अनिसच्या वडिलांशी संपर्क साधण्यात आला.

या घटनेबद्दल जवानाने त्याच्या वरिष्ठांना लगेच कळवले नव्हते तरी, बीएसएफ आपल्या जवानाच्या मदतीला धावून आली. आम्ही बीएसएफ जवानाच्या कुटुंबाला आर्थिक आणि घर बांधून देण्यासाठी मदत करणार आहोत. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी इंजिनिअरींग विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली आहे असे बीएसएफचे डायरेक्टर जनरल विवेक जोहरी यांनी सांगितले. बीएसएफकडून खासगी कॉन्ट्रॅक्टरला घर बांधणीचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात येईल. बीएसएफच्या वेल्फेअर फंडातून मोहम्मद अनिसला सोमवारी पाच लाख रुपयांचा चेक देण्यात येणार आहे.

जमावाने हल्ला केला त्यावेळी अनिसचे वडिल मोहम्मद मुनिस (५५) काका मोहम्मद अहमद (५९) आणि चुलत बहिण नेहा परवीन तिघेच घरामध्ये होते. सुदैवाने ते घरामधून बाहेर पडण्यास यशस्वी ठरले. नातेवाईकांच्या घरी त्यांनी आश्रय घेतला आहे. पुढच्या तीन महिन्यात बीएसएफ जवानाच्या घरामध्ये दोन लग्ने होणार आहेत. अनिसच्या चुलत बहिणीचे एप्रिल आणि त्याचे लग्न मे महिन्यात होणार आहे. तर मोहम्मद अनिसचे पुढच्या तीन महिन्यात लग्न आहे. त्यामुळं अनिसचे घर बांधून देणं ही आमच्याकडून त्याला लग्नाची भेट आहे असे विवेक जोहरी यांनी सांगितले.२०१३ पासून बीएसएफमध्ये कार्यरत असणाऱ्या अनिस मोहम्मद तीन वर्षांसाठी जम्मू-काश्मीरमध्ये तैनात होता.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment