केंद्रीय व राज्य प्रदूषण मंडळाच्या धर्तीवर महापालिका पातळीवर यंत्रणा तयार करण्याची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | शहरात खुलेआम अगदी मनपा कर्मचाऱ्यांकडूनही पालापाचोळा/ कचरा जाळला जातो, भर रस्त्यावर बागेमध्ये भूतदयेच्या नावाखाली कबुतरांना दाणे टाकून त्यांच्या पंखाद्वारे दम्याचे जंतू प्रसार होतो, अनेक वाहने प्रचंड धूर ओकत रस्त्यावरून वाहतूक करत असतात अशा सर्व विषयी दाद कुणाकडे मागायची? याची कसलीही यंत्रणा आज स्थानिक पातळी उपलब्ध नाही. त्यामुळे हे प्रदूषण थांबवणारी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करणारी यंत्रणा महानगरपालिकेने विकसित करावी अशी मागणी आज करण्यात आली. वॉरियर्स मॉम या स्वच्छ हवेसाठी देशपातळीवर काम करणाऱ्या गटाने आज स्वच्छ हवा व निळे आकाश आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त कार्यशाळा आयोजित केली होती. पुणे मनपाच्या पर्यावरण विभागाच्या सहकार्याने इंद्रधनुष पर्यावरण केंद्रात आयोजित केलेल्या या कार्यशाळेत मनपा सह विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी प्रतिनिधी यांनी सहभाग घेतला.

यावेळी हवेत प्रदूषण करणाऱ्या विविध प्रसंगाविषयी चर्चा झाली. त्यावेळी पुणे मनपाच्या पर्यावरण विभागाकडे प्रदूषण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची कसले अधिकार नसल्याची बाब पुढे आली. यासंदर्भात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण कायदा आणि त्याद्वारे स्थापित केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ अशा यंत्रणा आहेत. मात्र त्या औद्योगिक प्रदूषण इतर मोठ्या पातळीवर प्रदूषणाच्या मुद्द्यांवर काम करतात. हवा प्रदूषित करणाऱ्या इतर प्रकारचे प्रदूषण करणारे स्थानिक पातळी वेगवेगळे घटकांवर कारवाई करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधणे अवघड आहे.

मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियमानुसार नगरपालिकेच्या काही विभागांना काही विषयात कारवाईचे अधिकार आहेत. हे अधिकार एकत्र करून आणि राज्य प्रदूषण मंडळाला असलेले अधिकार राज्य शासनाच्या मान्यतेने महानगरपालिकेला घेऊन स्थानिक पातळीवर प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करणारी यंत्रणा महानगरपालिकेने विकसित करावी. पुणे महानगरपालिकेने हा पुढाकार घेऊन देशामध्ये एक उदाहरण घालून द्यावे अशी मागणी या वेळेच्या चर्चेमध्ये एकमुखाने करण्यात आली.

वॉरियर मॉम गटाच्या अनुजा बाली, देशातील पहिल्या महिला रिक्षा चालक शीला डावरे, पुणे मनपाचे पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार, फुफ्फुस विकार तज्ञ डॉक्टर विजय वराड, फुफ्फुस विकारावरील संशोधक डॉक्टर अपर्णा बिराजदार यासह दूषित हवेचा ज्यांच्यावर सर्वात पहिल्यांदा परिणाम होतो अशी लहान मुले,गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक, रस्ता विक्रेते, रिक्षा चालक यांचे प्रतिनिधी या कार्यशाळेत सहभागी झाले होते.

यावेळी डॉ.वराड आणि डॉ.बिराजदार यांनी प्रदूषण आणि विविध विकार याविषयी सदीप सादरीकरण केले. यावेळी बोलताना डॉ. वराड म्हणाले आपल्या देशामध्ये ज्या आजाराने सर्वात जास्त बळी जातात त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर काळा दमा हा विकार आहे.त्यासह विविध प्रकारचे कॅन्सर,हृदयरोग, पॅरालिसीसह मेंदूचे विविध विकार हवेच्या प्रदूषणामुळे होतात. याविषयी आपण कधी जागे होणार आहोत ? आपल्याला वैयक्तिक व सामाजिक सवयी बदलल्या पाहिजे. त्यासाठी लोकांचे प्रबोधन करण्याची गरज आहे आजचा दिवस हा त्यासाठी चांगले निमित्त आहे.

डॉ.बिराजदार म्हणाल्या ,क्षयरोगालाही हवेचे प्रदूषण निमित्त होते असे अगदी अलीकडच्या ताज्या अभ्यासात दिसून आले आहे. महाराष्ट्रातील क्षयरोगाचे प्रमाण विक्रमीरित्या वाढले आहे. विविध प्रकारच्या हवेच्या प्रदूषणामुळे निसर्गाचा समतोल ढासळतोच आहे.परंतु त्याचबरोबर मानवी शरीरावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे.विशेषतः लहान मुले आणि गरोदर माता त्याला मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत. या सर्वांचे मूळ हवेचे प्रदूषण असून ते रोखण्यासाठी विविध पातळीवर सामूहिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे.

वॉरियर मॉम गटाच्या सीमा अग्रवाल म्हणाल्या ,2019 पर्यंत जागतिक स्तरावर वायू प्रदूषणामुळे 30 लाख+ अकाली मृत्यू आणि भारतात 12.5+ लाख अकाली मृत्यू वायू प्रदूषणामुळे झाले आहेत. वायू प्रदूषणामुळे होणारे मृत्यू टीबी, मलेरिया आणि/किंवा एचआयव्ही पेक्षा 3 पट जास्त आहेत. यातून समाज म्हणून आपण काही बोध घेणार आहोत की नाही?