Friday, June 2, 2023

कृषी विभागाचा दणका : सातारा जिल्ह्यात 12 खत विक्रेत्या दुकानांचा परवाना निलंबीत

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर युरिया खताच्या विक्रीत अनियमीतता केल्याचे निदर्शनास आल्याने तसेच जादा दराने डिएपी खताची विक्री केल्याने आणि खताची विक्री करताना पॉस मशिनचा वापर न करणे, पॉस मशिनवरील साठा व प्रत्यक्ष साठा, नोंदवहीतील साठा न जुळणे, शेतकऱ्यांना योग्य प्रकारे बिले न देणे यामुळे जिल्ह्यातील 11 दुकानांचे विक्री परवाने निलंबीत करण्यात आले. तर एक खत विक्रेत्याचा कायम स्वरुपी परवाना रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

या कारवाईमध्ये कराड तालुक्यातील 3, फलटण तालुक्यातील 2, दहिवडी 2, वाई 2, सातारा तालुक्यातील 1, पाटण 1 या खत विक्रेत्यांचा समावेश आहे. पंचायत समितीस्तरावर व तालुका कृषि अधिकारी कार्यालयात निविष्टाबाबत तक्रार असल्यास ती नोंदविण्यासाठी तक्रार नोंदवही ठेवण्यात आली आहे.

खरीप हंगामात कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी घ्यावयाच्या दक्षता, ठेवावयाचे अभिलेख यांचे मार्गदर्शन कृषी विभाग करत आहे. निविष्ठा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना योग्य सेवा न दिल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.