राज्यात शाळा सुरु होणार, पण….;अजित पवारांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने राज्य सरकारने 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सविस्तर चरचा करण्यासाठी आज शिक्षण विभाग आणि टास्क फोर्सने बैठक बोलवली आहे. तत्पूर्वी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वपूर्ण माहिती दिली. “राज्यातील शाळा 4 तारखेपासून सुरु करण्याचा निर्णय झाला आहे, मात्र, दिवाळीनंतर पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने लहान मुलाच्या लसीकरणाबाबत लवकरात लवकर कळविणे गरजेचे असल्याचे पवार यांनी सांगितले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील कोरोना परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतली यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय झाला तरी पालकांची आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची मानसिकता दिसत नाही. लहान मुलांच्या लसीबाबत राज्याने निर्णय घेणे योग्यतेचे ठरणार नाही. याबाबतचा निर्णय हा केंद्राने घेणे आवश्यक आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाडा येथे अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या नुकसानीबाबतही माहिती दिली. या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत आहे. पण त्या ठिकाणी काही तालुके पूर्ण बाधित झाले आहेत तर काही ठिकाणी पूर्ण तालुके बाधित झाले नाहीत. राज्य सरकारने जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना सूचना दिल्या आहेत, विमा कंपन्याना सूचना दिल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.