Wednesday, February 1, 2023

सरकारी बंगल्यांवर ९० कोटी खर्चाचा आकडा आणला कुठून?; अजित पवारांनी आरोप फेटाळले

- Advertisement -

मुंबई । कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने, अनेक विकास कामांना निधी मिळत नसल्याचे चित्र एकीकडे असताना, दुसरीकडे मंत्र्यांची मंत्रालयातील दालने आणि त्यांच्या बंगल्यांवर गेल्या वर्षभरात तब्बल ९० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे वृत्त समोर आलं आहे. दरम्यान,  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांचे बंगले आणि दालनं यावर कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोप फेटाळला आहे. त्यात तथ्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ‘मंत्र्यांच्या बंगल्यांवर ९० कोटी रुपये खर्च झालेलेच नाहीत. या संदर्भात मी स्वत: माहिती घेतली. काहीही बातम्या दिल्या जातात. अद्याप कुठलाही आकडा पुढे आलेला नाही, मग हा ९० कोटी खर्चाचा आकडा आला कुठून?,’ असा प्रश्न त्यांनी केला. विधिमंडळ अधिवेशनासाठी विधानसभेत जाण्याआधी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात नवे सरकार आल्यानंतर त्या सरकारमधील मंत्री आपापल्या सोयीनुसार व आवडीनुसार शासकीय बंगल्यांमध्ये व कार्यालयांमध्ये बदल करत असतात. त्यावर खर्चही बराच होतो. मात्र, यावेळी करोनाचे संकट असल्यानं राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. विकासकामांसाठी पुरेसा निधी नाही. मात्र, मंत्र्यांचे बंगले व दालनांची कामे ९० टक्के पूर्ण झाली असून त्यांची देयकेही दिली जात असल्याचं वृत्त अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालं आहे.

- Advertisement -

‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, एकूण 31 बंगल्यावर जवळपास 15 कोटींची उधळपट्टी सुरु आहे. म्हणजेच साधारणत: सरासरी एका बंगल्यावर 80 लाख ते दीड कोटीपर्यंत खर्च सुरु आहे. यात सर्वात जास्त खर्च बाळासाहेब थोरात आणि छगन भुजबळांच्या बंगल्यावर होत आहे. रॉयल स्टोनसाठी 1 कोटी 81 लाख तर रामटेकसाठी 1 कोटी 48 लाखांचा खर्च होत आहे.

कोटींच्या घरात खर्च होत असलेले बंगले कुठले?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षा बंगला (३ कोटी २६ लाख), उपमुख्यमंत्री अजित पवार (देवगिरी -१ कोटी ७८ लाख), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (रॉयलस्टोन -२ कोटी २६ लाख), सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण (मेघदूत – १ कोटी ४६ लाख), सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (चित्रकूट -३ कोटी ८९ लाख), उद्योगमंत्री सुभाष देसाई (शिवनेरी -१ कोटी ४४ लाख), अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (रामटेक – १ कोटी ६७ लाख), वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (बी ३ – १ कोटी ४० लाख), पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (सातपुडा – १ कोटी ३३ लाख), नितीन राऊत (पर्णकुटी – १ कोटी २२ लाख) असे काही बंगल्यांवरील खर्चाचे आकडे आहेत. सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अग्रदूत व नंदनवन असे मलबार हिलवरील आजूबाजूचे दोन बंगले आहेत आणि त्यांच्यावरील खर्चाचा एकूण आकडा २ कोटी ८० लाख रुपये आहे.

विरोधी पक्ष तरी बोलणार काय?
विशेष म्हणजे यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सारंग बंगल्याच्या डागडुजीसाठी तब्बल 92 लाख खर्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या या उधळपट्टीवर विरोधी पक्ष तरी काय बोलणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. भाजप सरकारच्या काळात बंगल्यांच्या खर्चावरून कॅगनं ताशेरे ओढले होते. 14 एप्रिल 2016 ला राज्यातल्या सिंचन आणि इतर प्रकल्पांवर वाढलेल्या खर्चावर ताशेरे ओढल्यानंतर ‘कॅग’च्या अहवालात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

गेल्या 5 वर्षात डागडुजीसाठी तब्बल 52 कोटी रुपये खर्च
राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी गेल्या 5 वर्षात खर्चामध्ये 10 पट वाढ केल्याचं उघड झालं आहे. मलबार हिल येथील मंत्र्यांच्या निवासस्थानांच्या दुरुस्तीवर गेल्या 5 वर्षात तब्बल 52 कोटी रुपये खर्च केल्याचं कॅगच्या अहवालात समोर आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे बंगले 40 वर्षांपेक्षा जुने असल्यानं त्यांच्या दुरुस्तीवर खर्च करण्यापेक्षा त्यांची पुनर्बांधणी केली असती तर ती केवळ 37 कोटी रुपयांत झाली असती, असा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे. अशाच प्रकारे मॅजेस्टिक आमदार निवासस्थान धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्यानंतरही त्याच्या देखभाल दुरुस्तीवर 9.20 कोटी रुपये खर्च करण्यात आले. विशेष म्हणजे वारंवार पाठपुरावा होऊनही रुग्णालयं आणि पोलिसांच्या वसाहतींच्या दुरुस्तीकडे डोळेझाक केल्याचा ठपका कॅगनं ठेवलाय.

अजित पवारांचा आदर्श घेणार का?
आघाडी सरकारच्यावेळी उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर असाच लाखोंचा खर्च करण्यात आला होता. माहिती अधिकारात ही बाब उघड होताच अजित पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला 27 लाखांचा चेक दिला होता. आता अजित पवारांचा हाच आदर्श महाविकास आघाडीतले मंत्री घेणार का? आणि सामान्य जनतेचा पैशांचा चुराडा वाचवणार का? असा सवाल केला जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’