Monday, March 20, 2023

मी पंकजा मुंडेंच्या मागे होतो, आहे आणि राहील; देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य

- Advertisement -

टीम, HELLO महाराष्ट्र| परळी विधानसभा मतदार संघात झालेल्या पराभवानंतर माजी मंत्री पंकजा मुंडे नाराज असल्याचे पाहायला मिळत होते. त्यानंतर गोपीनाथ गडावर झालेल्या मेळाव्यात त्यांनी पक्ष नेतृत्वावरील नाराजी जाहीर बोलून दाखवली आहे. यावेळी बोलताना खडसेंनी नाव घेऊन तर मुंडेंनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता या संदर्भात फडणवीस यांनी भाष्य केलं असून, मी आजही पंकजा मुंडेंच्या पाठीमागे असल्याचे स्पष्ट केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

                                                                                                                                                                पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, पंकजा मुंडे यांच्याशी आम्ही संवाद साधू. पंकजा मुंडे यांना जेव्हा जेव्हा टार्गेट केलं गेलं तेव्हा मी कायमच त्यांच्या बाजूने उभा राहिलो आहे. त्यामुळे माझ्या मनात पंकजा मुंडे यांच्याबाबत आदराचीच भावना आहेच, ती आजही आहे, उद्याही राहिल. तसेच यावेळी खडसेंबद्दल विचारलं असता एकनाथ खडसे यांनी ज्या गोष्टी गोपीनाथ गडावरील मेळाव्यात बोलून दाखवल्या त्या त्यांनी मांडायला नको होत्या असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान भाजपात ओबीसींवर अन्याय होत असल्याच्या चर्चेवर देखील फडणवीसांनी भाष्य केलं आहे. ‘भाजपा हा ओबीसींचाच पक्ष आहे आणि कायम ओबीसींचा पक्ष राहिल. सर्वाधिक ओबीसी मंत्री भाजपाच्या सरकारमध्ये होते. ओबीसी मंत्रालय स्थापन झालं तेदेखील भाजपाच्याच सरकारमध्ये असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे

- Advertisement -