बीड, प्रतिनिधी, नितीन चव्हाण : भाजप नेत्या आणि माजी ग्रामविकास विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरु केलेल्या लाक्षणिक उपोषणाला माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सुमारे पंधरा मिनिटे हजेरी लावली. मात्र या पंधरा मिनिटांच्या काळात त्यांना त्यांचे बूटच चोरी जाण्याच्या धास्तीने ग्रासले असल्याचे चित्र उपोषणस्थळी पहायला मिळाले. फडणवीस लाक्षणिक उपोषणाच्या मंचावर बूट हातात घेऊनच वावरले. एवढेच नव्हे तर एका हातात बूट घेऊनच त्यांनी मीडियाला बाईट्सही दिल्या.
स्व. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या बॅनरखाली पंकजा मुंडे यांनी आज मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही हजेरी लावली. देवेंद्र फडणवीस उपोषणस्थळी सुमारे पंधरा मिनिटे होते. या पंधरा मिनिटांपैकी आठ मिनिटे त्यांनी भाषण केले आणि उर्वरित वेळेत मिडीयाला बाईट्स दिल्या. यावेळी त्यांच्या उजव्या हातात असलेल्या त्यांच्या बुटांनीच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. फडणवीसांना उपोषणस्थळाहून आपले बूट चोरीला जातील अशी धास्ती तर वाटत नाही ना? अशी चर्चाही उपोषणस्थळी ऐकायला मिळाली.