Wednesday, June 7, 2023

पटोलेंवर कारवाई करणे हे कर्तव्यच, उपकार नाहीत; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले. दरम्यान, भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारीच आहे की देशाच्या पंतप्रधानांना कोणी जीवे मारण्याची धमकी देत असेल तर त्याच्यावर कारवाई करावी. मुख्यमंत्र्यांचे ते कर्तव्यच आहे, उपकार नाहीत असा टोला फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

देवेंद्र फडणवीसांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबतीत जे विधान केले, त्यापेक्षा हे भयानक विधान आहे. केंद्रीय मंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना रातोरात अटक करणारे पोलीस आता का गप्प आहेत? मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारीच आहे की देशाच्या पंतप्रधानांना कोणी जीवे मारण्याची धमकी देत असेल तर त्याच्यावर कारवाई करावी.

मुख्यमंत्र्यांचे ते कर्तव्यच आहे, उपकार नाहीत. कायद्याच्या कितीही चिंधड्या उडवा, वाट्टेल तसा पोलिसी दबाव आणा! भाजपाचा कार्यकर्ता मूग गिळून गप्प बसून सहन करणार नाही आणि या राज्यातील जनताही तुम्हाला माफ करणार नाही. पटोलेंच्या विधानावरून काँग्रेस नेत्यांच्या मनात मोदींजींबद्दल असूया आहे हे दिसते. पंजाबमध्ये पंतप्रधानांचा ताफा अडवणे, त्यानंतर नाना पटोले यांचे विधान अशा प्रकारचे विचार लोकशाहीला घातक आहेत.

मी समर्थन करीत नाही की आमच्या एका कार्यकर्त्याने मुखमंत्र्यांच्या पत्नीला राबडी देवी म्हटलं तर मध्यरात्री त्याच्या घरी पोलीस जातात आणि नाना पटोले मी पंतप्रधानांना मारू शकतो अशी थेट धमकी देतात आणि त्यांच्या विरुद्ध साधी तक्रारही दाखल होत नाही, असे फडणवीस यांनी म्हंटले.

पटोलेंच्या गावात एकही मोदी नाही

नाना पटोले जे काही बोलतआहेत कि मी गावातील मोदी नावाच्या माणसाला बोललो. खोटे बोलत आहेत ते. नानांच्या गावात मोदी नावाची एकही व्यक्ती नाही. त्यामुळे ते कोणाबद्दल बोलले हे स्पष्ट झाले आहे. आता ते घाबरलेत. चारही बाजूने टीका सुरू झाल्याने ते पळ काढत आहेत, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.