फडणवीसांनी सरकार पाडण्यासाठी मुकर्रर केलेल्या तारखेलाही शुभेच्छा : राऊतांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. राजकारणात कोणी कुणाचा शत्रू नसतो. त्यामुळे फडणवीसांना आमच्या गुढी पाडव्याच्या शुभेच्छा आहे. त्यांनी जर सरकार पाडण्यासाठी नवी तारीख मुकर्रर केली असेल तर त्या तारखेलाही आमच्या शुभेच्छा आहेत, असा खोचक टोला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.

संजय राऊत यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी फडणवीसांना हा टोला लगावला. देवेंद्र फडणवीस आणि आमचे वैयक्तिक वाद नाहीत. आमचं राजकारणातील युद्ध आम्ही लढूच. त्यामुळे त्यांना गुढी पाडव्याच्या आमच्या शुभेच्छा आहेच. सरकार पाडण्यासाठी त्यांनी एखादी तारीख मुकर्रर केली असेल त्या तारखेलाही आमच्या शुभेच्छा आहेत,असेही राऊत म्हणाले.

महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती तशी नियंत्रणात आहे. राज्याबाहेरून येणाऱ्या लोकांमुळे महाराष्ट्रात कोरोना वाढत आहे. त्याकडेही लक्ष दिलं पाहिजे, असं ते म्हणाले. देशभरात कोरोना वाढत आहे. लोक कसेही वागत आहेत. लोकांनी नियम पाळले नाही तर संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू शकतो, असंही राऊत यांनी यावेळी सांगितले.

You might also like