.. म्हणून धनंजय मुंडेंनी बारामती गाठतं शरद पवारांची घेतली भेट 

पुणे ।  राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेऊन वाढदिवसानिमित्त त्यांचे आशीर्वाद घेतले. खुद्द शरद पवारांनी केक भरवून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळं धनंजय मुंडे यांच्यासाठी या वर्षीचा वाढदिवस खास ठरला. खरंतर, मुंडे यांचा वाढदिवस काल झाला. पण त्याचे खरे सेलिब्रेशन आज बारामतीमध्ये झाले. धनंजय मुंडे यांनी स्वत: ट्विट करून या खास सेलिब्रेशनची माहिती दिली आहे.

‘कोरोनामुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामती येथे आदरणीय पवार साहेबांची भेट घेतली. सुप्रिया ताईंनी काल झालेल्या वाढदिवसानिमित्त केक आणला होता. राष्ट्रवादी काँग्रेस हे एक कुटुंब आहे. या कुटुंबाचा ‘आधारवड’ कायम आमच्या मागे भक्कम उभा असतो. धन्यवाद साहेब, ताई! असाच आशीर्वाद राहू द्या,’ अशा भावना मुंडे यांनी ट्विटवर व्यक्त केल्या.

यावेळी धनंजय मुंडे यांनी पवार कुटुंबाशी झालेल्या भेटीचे दोन फोटोही शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोमध्ये शरद पवार हे धनंजय यांना केक भरवताना दिसत आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी आपला वाढदिवस यंदा परळी येथील आपल्या घरीच अत्यंत साधेपणानं साजरा केला होता. कार्यकर्त्यांनीही भेटायला येऊ नये असं आवाहन केलं होतं. त्यानंतर आज, वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी बारामती गाठून पवारांचे आशीर्वाद घेतले.