बीड,प्रतिनिधी, नितीन चव्हाण : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन आयुष्याची व्यथा कथन करणार्या दोन कुटुंबांतील पाच जणांना आयुष्यातील पहिले फलित रविवारी (ता. 26) मिळाले. मुंडे यांच्या हस्ते पाच जणांच्या हाती प्रत्येकी एक लाख रुपयांच्या शासकीय मदतीचे धनादेश देण्यात आले. विशेष म्हणजे भेटीनंतर मुंडेंनी केलेल्या घोषणेनंतर अवघ्या 48 तासांच्या आत ही मदत दिली. कायम उपेक्षा मिळालेल्या ‘त्या’ पाचही जणांनी इतक्या तत्परतेने मिळालेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त करताना भावुक होऊन मुंडे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला श्री नगद नारायण पावले’ अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथील यादव क्षीरसागर, विठ्ठलबाई क्षीरसागर, सम्राट क्षीरसागर, राजाबाई साठे, मुरलीधर साठे या दोन कुटुंबांतील पाचही व्यक्ती अंध आहेत. कलेच्या माध्यमातून ते पोटाची खळगी भरतात. शुक्रवारी (ता. 24) दुपारी त्यांची पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत भेट झाली. मुंडे यांनी या कुटुंबीयांची व्यथा ऐकून त्यांना शासकीय मदतीची घोषणा केली होती. विशेष म्हणजे त्यांच्या मदतीचे प्रस्तावदेखील समाजकल्याण आधिकार्यांनाच तयार करायला लावले. समाजकल्याण उपायुक्त डॉ. सचिन मडावी आणि जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री. एडके यांनी दिव्यांग बीज भांडवल योजनेतून व समाजकल्याण विभागाच्या शेष निधीतून प्रत्येकी एक लाख रुपयांच्या मदतीचे प्रस्ताव तयार केले. शनिवारी (ता. 25) रात्री एकला संबंधितांना पालकमंत्री अध्यक्ष असलेल्या अपंग कल्याण निधीतून प्रत्येकी एक लाख रुपये मदतीच्या आदेशावर पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांनी स्वाक्षरी केली.
त्याच परिवारातील सम्राट याला 18 वर्षे पूर्ण नसल्याने मदत निधी न देता त्याचा शिक्षण व पूरक खर्चासाठी शिष्यवृत्ती देण्याचेही घोषित केले आहे. त्यानंतर रविवारी धनंजय मुंडे यांनी मुख्य शासकीय मुख्य ध्वजवंदन केल्यानंतर या मदतीचे धनादेश अंध व्यक्तींच्या हाती दिले. आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, समाजकल्याण उपायुक्त डॉ. सचिन मडावी, समाजकल्याण अधिकारी राजू येडके आदी उपस्थित होते.