कोयना धरणातून पाणी सोडले : नदीकाठच्या गावांना व्यवस्थापनाचा सतर्कतेचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलानी

कोयना पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून दमदार पाऊस पडत असुन धरणात व नदीपात्रात पाण्याची पातळी वाढू लागली आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोयना धरण व्यवस्थापनाने शुक्रवारी सकाळी कोयना धरण पायथा वीजगृहातील दोन जनित्राद्वारे वीज निर्मिती करून पूर्वेकडे कोयना नदी पात्रात 2100 क्युसेक्स पाणी विसर्ग केला आहे. नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

कोयना पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे तब्बल 2 हजार 100 कयुसेक इतक्या क्षमतेने पाणी पायथा गृहामधून सोडण्यात आलेले आहे. 105 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणात सध्या 35.46टीएमसी पाणीसाठा असुन धरणात 24 हजार 275 कयुसेक इतकी पाण्याची आवक होत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अगोदरच कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यातच आता पायथा वीजगृहातून पाणी सोडण्यात आले असल्याने नदीकाठच्या लोकवस्ती, शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या योजनांबाबत आवश्यक त्या खबरदाऱ्या घ्याव्यात, असे आवाहन कोयना धरण व्यवस्थापनासह महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment