व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

फोनवरून संपर्क केल्‍याचा वाद वाढला आणि पती-पत्‍नीने संपवले आयुष्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एका तरुणाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केल्‍यानंतर रुग्‍णालयात सुश्रूषा करण्‍यासाठी आलेल्‍या त्याच्या पत्‍नीने रुग्‍णालयातच आत्‍महत्‍या केली. १३ नोव्‍हेंबरला घडलेल्‍या या घटनेनंतर काही तासांत पतीचाही मृत्‍यू झाला. आता दोघा पती-पत्‍नीच्‍या आत्‍महत्‍या प्रकरणी वेगळेच कारण समोर आले आहे. मृत तरूणाच्या वडिलांच्या तक्रारीवरून एका आरोपीच्‍या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

प्रकाश जगन शिंदे (२७) रा. माळेगाव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सुरेश सावंत (३५) रा. माळेगाव असे मृताचे नाव आहे. त्याने ११ नोव्हेंबर रोजी सकाळी शिवारातील आपल्या शेतात जाऊन पेटवून घेतले होते. १३ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आरोपी प्रकाश शिंदे हा सुरेश याच्या पत्नीला नेहमी मोबाइलवर संपर्क साधत होता. या कारणावरुन सुरेश व प्रकाश यांचे ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास भांडण झाले. त्यावेळी प्रकाशने सुरेशला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली होती. त्यामुळे सुरेशने शेतात जाऊन स्वत:ला जाळून घेतले. त्याच्यावर अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू होते.

 

त्यामुळे त्याची पत्नी आरतीदेखील रुग्णालयातच मुक्कामाला होती. आरतीचे १३ नोव्हेंबर रोजी सकाळी रुग्णालयातील कठड्याला साडीच्या सहाय्याने गळफास लावत आत्महत्या केली होती. त्या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. आरतीचा पती सुरेशने आपल्या मृत्यूपूर्व जबाबात प्रकाशने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने आपल्याला ते अपमानजनक वाटले. त्यामुळे आपण जाळून घेतल्याचे म्हटले होते. त्यामुळे मृताचा मृत्यूपूर्व जबाब व त्याचे वडील शिवनाथ सावंत (६०) रा. माळेगाव यांच्या तक्रारीच्या आधारावर कुऱ्हा पोलिसांनी आरोपी प्रकाश शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.