Friday, June 9, 2023

जिल्हा बॅंक निवडणूक : पालकमंत्री बाळासाहेब पाटील कराड दक्षिणेत भाजपच्या गोठात

सातारा प्रतिनिधी | विशाल पाटील

सातारा जिल्हा बॅंकेच्या सोसायटी गटातून कराड येथून सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भाजपचे नेते डाॅ. अतुल भोसले यांच्या गटातील मतदारांच्या भेटीगाठीवर भर दिला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे मंत्री सध्या भाजपच्या गोटात जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने असल्याचे चित्र पहायला मिळत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काॅंग्रेसचे अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांना धोबीपछाड करण्यासाठी भाजपची मदत घेत आहेत.

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट दिसून येत असून कराड सोसायटी गटातील निवडणुकीकडे जिल्ह्याचे नव्हे तर राज्यातील जाणकारांचे लक्ष लागून राहिले. अशावेळी राष्ट्रवादीचे नेते, मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सोसायटी गटातून अर्ज भरल्याने निवडणूक प्रतिष्ठेची बनलेली आहे. त्यामुळे राज्यात व देशात राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीचा विरोधी पक्ष असलेला भाजपाच्या मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर राष्ट्रवादीचे पक्षाचे आमदार बाळासाहेब पाटील जोर दिला आहे.

कराड दक्षिणमधील भाजपचे नेते डाॅ. अतुल भोसले यांच्या गटाशी पालकमंत्र्यांनी जवळीक सुरू केली आहे. पालकमंत्र्यांचे बंधू जयंत पाटील यांची आणि माझी मैत्री असल्याचे खुद्द डाॅ. अतुल भोसले यांनी दोनच दिवसापूर्वी सांगितले आहे. मात्र अॅड. उदयसिंह पाटील हेही मित्र होते. त्यामुळे सोसायटी गटातून कोणाला मदत करणार हे ठरलेले नसून योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असा सूचक इशाराही डाॅ. भोसले यांनी दिला आहे. मात्र तरीही पालकमंत्री यांनी डाॅ. भोसले यांच्या कृष्णा सहकारी साखर कारखन्यांचे उपाध्यक्ष जगदीश जगताप यांची त्यांच्या वडगाव हवेली येथील फाॅर्म हाऊसवर अर्ज दाखल करण्याच्या अगोदर भेट घेतली होती.

सोसायटी गटातून अर्ज दाखल केल्यानंतर आटके येथील स्वर्गीय पैलवान संजय पाटील यांच्या निवासस्थानी त्यांचे बंधू धनाजी पाटील यांची भेट घेतली. तर स्वर्गीय माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे कट्टर समर्थक बेलवडे बुद्रुकचे पैलवान जगन्नाथ मोहिते यांच्या निवासस्थानाही भेट झाली. पैलवान जगन्नाथ मोहिते हे विलासकाका याचे विश्वासू मात्र त्यांचे घरातील पुढच्या पिढीची जवळीकता ही भोसले कुटुंबिया सोबत वाढलेली असल्यानेच पालकमंत्री यांनी कराड दक्षिणमध्ये भाजपच्या गोठातील मतदारांना गाठले आहे.