औरंगाबाद | सोयगाव तालुक्यातील गलवाडा येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात सात जण जखमी झाले असून, यातील गंभीर पाच जणांना उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. गलवाडा (ता. सोयगाव) गावानजीक ही घटना घडली. जखमींपैकी काही जण सोयगाव येथील शासकीय कामे आटोपून तर काही जण शेतीकाम आटोपून घरी परतत होते.
पिसाळलेल्या कुत्र्याने सोयगाव-गलवाडा रस्त्यावर वाहनाने जात असलेल्या पाच जणांसह शेतातून पायी घरी जाणाऱ्या दोघांना लक्ष्य केले आणि चावा घेतला. काहींच्या हातापायाचे लचके तोडले तर एकाच्या पोटाला चावा घेतला. सातही जखमींना उपचारासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. केतन काळे, गोपाल देहाडे यांनी त्यांच्यावर उपचार केले. या सात जणांपैकी आनंदा इंगळे (वय ५७), नंदाबाई औरंगे (वय ३५), लीलाधर इंगळे (वय ७१), सोनाली वाघ (वय २४. सर्व रा.गलवाडा) व अलीखा पठाण (वय ५०, रा. वेताळवाडी) हे पाच जण गंभीर जखमी असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.
गावात दहशत पिसाळलेल्या कुत्र्याने सात जणांचे लचके तोडले असताना त्याचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतीही यंत्रणा उशिरापर्यंत घटनास्थळी दाखल झाली नव्हती. हा कुत्रा अद्याप मोकाट असल्याने. गलवाडा गावासह परिसरात दहशत पसरली आहे. सोयगाव गलवाडा हा रस्ता वेताळवाडी, गलवाडासह या भागाला सिल्लोड तालुक्याशी जोडणारा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वर्दळ असते. पिसाळलेल्या कुत्र्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या कुत्र्याला आवर घालण्याची मागणी नागरकांमधून होत आहे.