वाठारच्या मुकादम विद्यालयात देणगीदारांचा सत्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | दानशूर बंडो गोपाळा मुकादम विद्यालय व वसंतराव उर्फ डी. के. पाटील
ज्युनिअर कॉलेज वाठार येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्य इमारतीवरील काम पूर्ण करण्यासाठी मदत केलेल्या थोर देणगीदारांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्था सहसचिव (माध्य.) राजेंद्र साळुंखे व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. हणमंतराव कराळे- पाटील होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे सातारा- रायगड विभागाचे माजी इन्स्पेक्टर आर. एल. नायकवडी, सरपंच सौ. शोभा माणिकराव पाटील, स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष राजेश पाटील, अधिकराव पाटील, प्रभाकर पाटील, यशवंत हायस्कूलचे मुख्याध्यापक डी. डी. पाटील आदि उपस्थित होते. मुकादम तात्यांचे चिरंजीव विलासराव कदम व इतर कुटुंबिय आवर्जून उपस्थित होते.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी मुख्य इमारतीवर पत्र्याचे झाकण टाकण्यासाठी मदत केलेल्या थोर देणगीदारांचे सत्कार करण्यात आले. हे काम अल्पावधीत पूर्ण केल्याबद्दल दानशूर स्टाफचे कौतुक केले. इमारत रंगकाम, खिडक्या दुरूस्ती, व मुख्य प्रवेशद्वाराचे काम पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांना मदतीसाठी आवाहन करण्यात आले. यावेळी वाठार व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, थोर देणगीदार, हितचिंतक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीम. पी. टी. बारवकर व सौ. ए. आर. उकिर्डे यांनी केले. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक एस. टी. कांबळे यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक एस. आर. पतंगे यांनी केले. आभार ए. डी. मिसाळ यांनी मानले.