कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून वातावरणीय बदलांमुळे सर्वत्र सर्दी, ताप, खोकला अशा प्रकारचे संसर्गजन्य आजार उद्भवत आहेत. तसेच अलीकडे कोविडचे रुग्णही काही प्रमाणात आढळून आल्याने नागरिकांमध्ये एकप्रकारची धास्ती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. परंतु, कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतील विषाणूप्रमाणे पोस्ट कोविड हा तितकासा घातक नाही. हा बहुतांशी वातावरणीय बदलाचा परिणाम असून योग्य उपचारांनी पोस्ट कोविड बरा होत असल्याची माहिती शारदा क्लिनिक एरम हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. चिन्मय एरम यांनी दिली.
कोविडनंतर रुग्णांमध्ये पोस्ट कोविडपासून उद्भवणाऱ्या विविध आजारांबाबत नुकतीच एक कार्यशाळा पार पडली. यावेळी डॉ. एरम म्हणाले की, कोविडनंतर काही रुग्णांमध्ये विविध प्रकारचे आजार उद्भवल्याचे समोर येवू लागले आहेत. कोविडवरील औषोधोपचार, रेमडीसिव्हर, कोविड प्रतीबंधिक लसीकरण व बुस्टर डोस आदींचे दुष्परिणाम रुग्णांवर विविध आजारांच्या माध्यमातून दिसून येत आहेत. त्यात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या घटनांचे प्रमाण जास्त आहे. परंतु, सदरच्या व्यक्तीचा कोविड व त्यावरील औषधांमुळेच मृत्यू झाल्याचे म्हणता येणार नाही.
याबाबत नागरिकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. परंतु, काहींमध्ये संधिवात, मानेचे व मणक्याचे आजार, त्वचारोग आदींसारखे आजार उद्भवल्याचे दिसून येत आहे. मात्र, सध्या वातावरणीय बदलांमुळे बहुतांश ठिकाणी सर्दी, खोकला व ताप अशा प्रकारचे संसर्गजन्य आजार आढळून येत आहेत. तसेच सध्या पोस्ट कोविडचे काही रुग्ण आढळून येत असल्याने लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे. परंतु, हा पोस्ट कोविड पहिल्या लाटेतील कोविड-19, तसेच H1N1 यासारख्या विषाणू इतका घातक नाही. ग्रामीण भागामध्ये बहुतांशी लोक किरकोळ आजारांवर प्राथमिक स्तरावर उपचार घेऊन बरे होत आहेत. त्यातील काही जणांना त्रास झाल्यानंतर किंवा प्रतिकारशक्ती कमी असलेले रुग्ण रुग्णालयांमध्ये ऍडमिट होतात. मात्र, योग्य औषधोपचाराने ते पूर्णपणे बरे होत असून नागरिकांनी पोस्ट कोविडला घाबरून जाण्याची गरज नाही.