Dream XI स्पोर्ट्स गेम का जुगार? सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ महत्त्वपूर्ण निकाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ड्रीम इलेव्हन नावाच्या स्पोर्ट्स गेमवर बंदी घालण्याच्या जनहित याचिकेवर सुप्रीम कोर्टाने आज महत्वाचा निर्णय सुनावला आहे. या अगोदर राजस्थान हायकोर्टाने दिलेला निर्णय कायम ठेवत सुप्रीम कोर्टाने ड्रीम 11 वर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती आरएफ नरिमन आणि न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या खंडपीठाने हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे.

ड्रीम 11 हा एक ऑनलाईन फॅन्टसी स्पोर्ट्स गेम आहे, यामध्ये लाईव्ह मॅच सुरू व्हायच्या आधी फॅन्टसी स्पोर्ट्स टीम बनवता येते, तसंच चाहत्यांना स्पर्धांमध्येही भाग घेता येतो. मॅच संपल्यानंतर चाहत्याने निवडलेल्या खेळाडूंना सर्वाधिक पॉईंट्स मिळाले, तर त्याला पुरस्कार म्हणून रोख रक्कम देण्यात येते. या विरोधात चंद्रेश सांखला नावाच्या एका व्यक्तीने राजस्थान हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. त्याने आपल्या याचिकेत ड्रीम 11 च्या नावाने लोकांची फसवणूक केली जात आहे, असा आरोप केला होता.

यावर राजस्थान हाय कोर्टाने ही याचिका फेटाळत पंजाब-हरियाणा आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला दिला. ड्रीम 11 जुगार आणि सट्टेबाजी नसल्याचं मत हायकोर्टाने मांडलं होतं. पंजाब ऍण्ड हरियाणा हायकोर्टाने ड्रीम 11 वर बंदीची याचिका फेटाळली होती. ‘ड्रीम 11 सारख्या ऑनलाईन खेळात वापरकर्त्यांना पुरस्कार व्यायाम, चांगलं ज्ञान, निर्णय आणि लक्ष यामुळे मिळतात. हा कौशल्याचा खेळ आहे,’ असं निरिक्षण पंजाब ऍण्ड हरियाणा हायकोर्टाने नोंदवलं होते. तसेच मुंबई हायकोर्टानेही हा खेळ कौशल्याचा असून एखाद्या विशिष्ट टीमच्या विजय किंवा पराभवावर अवलंबून नाही, असं मत नोंदवले होते.

Leave a Comment