हिंगोलीत आयशरच्या अपघातात चालकाचा मृत्यू
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अकोला – हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या माळहिवरा पाटीजवळ मध्ये पहाटेच्या वेळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आयशर चालकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात असलेली आयशर गाडी समोरील ट्रकवर आदळली. सदर घटना शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात नांदेड जिल्ह्यातील हदगाव मधील शेख अनवर शेख कटूमिया यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून नांदेड जिल्ह्यातील हादगाव येथील आयशर चालक शेख अनवर हे आयशर टेम्पोमध्ये नागपूर येथून संत्री घेऊन नांदेडकडे जात असताना दुर्दैवी घटना घडली. हिंगोली ते वाशिम महामार्गावर असलेल्या माळीवरा फाट्यावर समोर उभ्या असलेल्या केळीच्या ट्रकवर भरगाव वेगात येणाऱ्या आयशर टेम्पोने धडक दिल्यानंतर आयशरच्या समोरील भागाचा चुराडा झाला आहे. हा अपघात एवढा भयानक होता की, चालक शेख अनवर हे या अपघातात अडकून पडल्याने गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची घटना घडताच हिंगोली ते वाशिम मार्गावर असलेली वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले यांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी आयशर टेम्पोमध्ये अडकून पडलेल्या शेख अनवर यांचा मृतदेह बाहेर काढून पुढील उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आयशर टेम्पो चालकाला पहाटे डुलकी लागली असावी आणि त्यातच त्याचा गाडीवरील ताबा सुटला असावा , असा देखील अंदाज यावेळी वर्तवला जात आहे. ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात अपघातात झाला असल्याची देखील शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.