NCBचा तपास पोहोचला टीव्ही कलाकारांपर्यंत; टीव्ही स्टार अबिगेल पांडे आणि सनम जोहरवर गुन्हा दाखल

मुंबई । बॉलिवूड कलाकारांनंतर आता टीव्ही कलाकार नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या(NCB) रडारवर आले आहेत. टीव्ही स्टार अबिगेल पांडे आणि सनम जोहर यांच्याविरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अबिगेल पांडे आणि सनम जोहर हे दोघे रिअल लाईफ कपल आहेत. टीव्हीमध्ये विविध मालिकांमध्ये दोघांनी काम केलं आहे.

मागील २ दिवसांपासून NCBकडून अबिगेल पांडे आणि सनम जोहर यांची चौकशी केली जात होती. 23 सप्टेंबरला पहिल्यांदा दोघांना NCBकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्या दिवशी दोघांकडून दिलेल्या माहितीच्या आधारे 24 सप्टेंबरला एनसीबीकडून मुंबईमध्ये ३ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. सुरुवातीला जेव्हा अबिगेल पांडे आणि सनम जोहर यांच्या घराची NCBकडून झडती घेण्यात आली, त्यावेळेस त्यांना तिथे गांजा सापडला.

आज पुन्हा अबिगेल पांडे आणि सनम जोहर यांच्या घराची झडती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून घेण्यात आली. तसेच या दोघांवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून ड्रग्सच सेवन केल्याप्रकरणी NDPSअॅक्ट 20 अंतर्गत गुन्हा देखील नोंदवण्यात आला. मात्र दोघांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. अबिगेल पांडे आणि सनम जोहर या दोघांकडून टीव्ही इंडस्ट्रीमधील अजून काही मोठी नाव ड्रग्स प्रकरणात समोर आली.

रिया चक्रवर्तीच्या ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असलेल्या मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने काही ड्रग्स पेडलरला अटक केली होती आणि त्यांच्याकडूनच अबिगेल पांडे आणि सनम जोहर ही नावं समोर आली होती. ज्या नंतर एनसीबीच्या तपासाची दिशा टीव्ही इंडस्ट्रीकडे वळली. ड्रग्ज प्रकरणात टीव्ही इंडस्ट्रीमधील पहिल्यांदा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून येणाऱ्या दिवसांमध्ये अजून मोठ्या नावांचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

You might also like