Friday, January 27, 2023

पंढरपुरात पोलिस ठाण्यातच मद्यपी पोलिसांचा डॉल्बीवर धिंगाणा

- Advertisement -

सोलापूर प्रतिनिधी । पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी मद्यपान करून डाॅल्बीवर डान्स केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये काही पोलीस मद्यधुंद अवस्थेत नाचत असल्याचे विदारक चित्र ही पाहायला मिळाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध घातले असताना चक्क पोलिसांनी मद्यधुंद होऊन डान्स केला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांऐवजी पोलिसांनीच शिस्तीचा भंग केल्याचं पाहायला मिळालं.

- Advertisement -

पोलिसांनी लावलेल्या डाॅल्बीच्या कर्कश आवाजाने परिसरात सगळीकडे अशांतता पसरली होती. पोलिसांचा डान्स पाहण्यासाठी पोलिस ठाण्यासमोर बघ्याची मोठी गर्दी झाली होती. काही नागरिकांनी मात्र पोलीस कर्मचाऱ्यांच्या या कृत्यामुळे संताप व्यक्त केला आहे.

कोरोना व्हायरसमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी रंगपंचमी साजरी करण्यास मनाई केली होती. परवानगी नसताना जर कोणी रंगपंचमी खेळताना दिसलं तर त्याच्यावर कारवाई होईल असं ही सांगण्यात आलं होतं. आता या मद्य पिऊन डॉल्बीच्या तालावर डान्स करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर प्रशासन काय कारवाई करत ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.