Monday, January 30, 2023

प्रत्येक प्रभागात एक वार्ड असेल महिलांसाठी राखीव

- Advertisement -

औरंगाबाद – राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार मनपा मध्ये आता प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मनपा क्षेत्रात 37 प्रभाग तीन वॉर्डांचे तर एक प्रभाग 4 बोर्डाचा होणार आहे. एकूण 38 प्रभागातील एक वॉर्ड महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

औरंगाबाद महापालिकेची मुदत 29 एप्रिल 2020 रोजी संपली होती. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेतील प्रभाग रचना व आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. त्यातच कोरोना चा प्रादुर्भाव वाढला. तसेच आजही निवडणूक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल असल्याने मनपाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. मागील महिन्यात राज्य सरकारने मुंबई वगळता राज्यातील सर्व मनपाच्या निवडणुका बहुसंख्य प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर केला. तीन वार्डांचा एक प्रभाग असेल असेही यावेळी जाहीर करण्यात आले होते. ज्या ठिकाणी तीन वार्डांचा एक प्रभाग करणे शक्य होणार नाही. त्या ठिकाणी दोन किंवा चार वार्डांचा एक प्रभाग करावा अशीही सूचना केली आहे.

- Advertisement -

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे अध्यादेशात रूपांतर झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी निवडणुकीसाठी पात्र असलेल्या सर्व पालिकांच्या आयुक्तांच्या नावे लेखी आदेश काढत प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करून तो निवडणूक आयोगाला पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 12 लाख 28 हजार 32 इतकी आहे. एप्रिल 2020 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी 9 लाख 42 हजार 532 मतदारांची प्रारुप मतदार यादी तयार केली होती. यात आता काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. लोकसंख्या आणि बोर्डांची संख्या लक्षात घेता 37 प्रभाग तीन वॉर्डांचे तर एक प्रभाग चार वार्डांचा असेल एका प्रभागात 22 ते 28 हजार मतदार असण्याची शक्यता आहे.