राजकारण करून लोकांचे जीव घेण्यापेक्षा जीवदान देऊन पुण्य कमवा : जितेंद्र आव्हाड यांचा केंद्र सरकारवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात करोनाची वाढती संख्या लक्षात घेता. कोरोनाची साखळी तोडणे महत्त्वाचे बनले आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. अशातच कोरोनातून मार्ग म्हणजे लसीकरण हाच एक आशेचा किरण आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून लसींच्या कमतरतेमुळे राज्यात लसीकरण ठप्प झाले आहे. यावरूनच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोना लसींच्या आयातीवरील बंदी ताबडतोब उठवावी, लसीवर केंद्राचे नियंत्रण कशासाठी? असा सवाल उपस्थित केला आहे.

सोशल मीडियावर नेहमी ॲक्टिव असणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अधिकृत अकाउंट वरून एक ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की “कोविड वॅक्सिनच्या आयातीवरील बंदी ताबडतोब उठवावी. जेणेकरुन बाजारपेठांमध्ये वॅक्सिनची उपलब्धता वाढेल व कमतरता भासणार नाही. त्यावर केंद्राच नियंत्रण कशासाठी ? लसींचे राजकारण करुन लोकांचे जीव घेण्यापेक्षा लोकांना जीवनदान देऊन पुण्याई कमवावी. वॅक्सिनची बाजारपेठ उघडी करा” अशा आशयाचे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.

राज्यातील कोरोना परिस्थिती चिंताजनक

राज्यात कोरोनाने हाहाकार केला असून कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात वीकेंड लॉकडाउन जाहीर करण्यात आला असून देखील रविवारी कोरोनाचा विस्फोट झाला. गेल्या २४ तासांत राज्यात ६३ हजार २९४ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे.राज्यात एकूण ३४९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर १.७ टक्के इतका आहे. याबरोब राज्यात काल ३४ हजार ००८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २७ लाख ८२ हजार १६१ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.६५ टक्क्यांवर आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी काल टास्क फोर्सची बैठक घेतली. या बैठकीत 8 दिवसांचा लॉकडाऊन लावावा, असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलंय. तर टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी किमान 14 दिवसांचा लॉकडाऊन पाहिजे, तर आपण कोरोनाची साखळी तोडू शकते, असं मत मांडलंय. त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसांत लॉकाडाऊनसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like