देशात महाराष्ट्रासह अनेक भागात भूकंपाचे हादरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील बहुतांश भागांना भूकंपाचा हादरा बसल्याचं वृत्त आहे. मंगळवारी लडाख, महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार येथे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (National Centre for Seismology-NCS)च्या माहितीनुसार लडाखच्या कारगिल भागात पहाटे ५ वाजून ४७ मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. याची तीव्रता ४.४ रिक्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू कारगिलच्या उत्तर – पश्चिम भागात ४३५ किमी.वर होता.

लडाखमध्ये भूकंप येण्यापूर्वी अंदमान- निकोबार बेट समुहांमध्येही धरणीला हादरा बसल्याचं जाणवलं. या भागात भूकंपाचा केंद्रबिंदू बेट समुहापासून २० किलोमीटर दूर डिगलीपूर येथे होता. इथं जाणवलेल्या भूकंपाची तीव्रता ४.० रिक्टर स्केल इतकी होती. सोमवारी मध्यरात्र उलटून तीन वाजण्याच्या सुमारास हा भूकंप जाणवला होता. लडाखसह महाराष्ट्रातही सोमवारी मध्यरात्र उलटून १ वाजून ०५ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य हादरा जाणवला. पालघर येथे जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता ३.१ रिक्टर स्केल इतकी होती.

सोमवारी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये भूकंपाचे अनेक धक्के जाणवले. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पालघर हा भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचं निदर्शनास आलं आहे. दरम्यान, भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळं इथे कोणतंही नुकसान झालेलं नाही. पण, जनमानसात मात्र भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment