Sunday, June 4, 2023

गृहमंत्रीपदाचा हिसका दाखवा अन् 2-4 भाजप नेत्यांना तुरूंगात पाठवा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता आल्यानंतर सरकार मधील अनेक नेते आणि मंत्र्यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडत आहेत. याचवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोप होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी एक मोठं विधान केले आहे. गृहमंत्रीपदाचा हिसका दाखवा अन् 2-4 भाजप नेत्यांना तुरूंगात पाठवा अशी विनंती एकनाथ खडसे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जळगाव दौऱ्यावर असून यावेळी आयोजित एका कार्यक्रमात बोलताना खडसे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांवर रोज धाडी पडत आहेत. आपले दोन नेते तुरूंगात गेले आहेत. किमान आता तरी गृहमंत्रीपदाचा हिसका दाखवा. 2-4 भाजप नेत्यांना तुरूंगात पाठवा, असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

यांची शेकडो प्रकरणं आहेत. दोन चार लोकांना जर वर्षापूर्वी आत टाकलं असतं तर आज ही परिस्थिती आली नसती. जे सत्य आहे ते करा, कोणाला छळू नका, द्वेषाचं राजकारण करु नका. पण ज्यांनी केले आहे त्यांना भोगायला लावा, तर मग ही परिस्थिती निर्माण होणार नाही,” असं म्हणत सरकारला माझी विनंती आहे की, सत्य आह ते जगाच्या समोर आणलं पाहिजे, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.