एकनाथ खडसे यांच्या अडचणी पुन्हा वाढणार?; महसूल विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाही. कारण नाशिकच्या मुक्ताईनगर येथील सातोड प्रकरणात आता एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. महसूल विभागाने एसआयटी स्थापन करण्याच्या निर्णयाने एकनाथ खडसे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांच्या नावाने सातोड शिवारात 33 हेक्टर 41 आर जमीनीची खरेदी करण्यात आली होती. या ठिकाणी शालेय कारणासाठी बिनशेती परवाना म्हणजेच एनए प्रदान करताना अनियमितता झाली असल्याचा प्रकार घडला होता. तसेच गौण खनिज प्रकरणात अवैध उत्खनन करत तब्बल ४०० कोटी रुपयांचा महसूल बुडवल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात केला होता. आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी केली होती.

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या मागणीनंतर नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

नाशिकच्या सातोड प्रकरणात तब्बल 400 कोटी रूपयांचा घोळ झाल्याचा सनसनाटी आरोप चंद्रकांत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात केला. त्यांच्या आरोपानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात जानेवारी 2019 मध्ये आधीच एनए झालेल्या शेतीला पुन्हा कृषक करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला. तसेच काही दिवसांमध्येच प्रांताधिकार्‍यांनी याला तात्काळ शेतीसाठी परवानगी दिल्याचे पाटील यांनी म्हटले होते. यामुळे महसूल खात्याच्या आशीर्वादाने शालेय प्रयोजनासाठी असलेल्या या शेतीला पुन्हा कृषक करण्यात आल्याचा त्यांचा आरोप होता.

त्यांच्या आरोपानंतर याच ठिकाणावरून अवैध गौणखनिज उत्खनन करण्यात आले. वास्तविक या याठिकाणी 10 हजार ब्रासच्या उत्खननाची परवानगी होती. मात्र येथून लाखो ब्रास मुरूमासह अन्य गौणखनिजाचे उत्खनन करण्यात आले. या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली होती. या मागणीनुसार विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन केली आहे.