औरंगाबाद-पुणे मार्गावर आता धावणार इलेक्ट्रिक बस 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – औरंगाबाद-पुणे या गर्दीच्या मार्गावर साधारण जुलैपासून इलेक्ट्रिक बससेवा सुरु करण्याची तयारी महामंडळाने केली आहे. यासाठी औरंगाबाद आगाराला 20 इलेक्ट्रीक बस दिल्या जाणार आहेत. इलेक्ट्रिक बससेवा सुरु होणार असल्याने महामंडळाने चार्जिंग स्टेशनच्या कामाला सुरुवात केली असल्याची माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.

 

राज्य शासनाने स्वीकारलेल्या इलेक्ट्रीक वाहन धोरणाच्या अनुषंगाने एसटी महामंडळाच्या ताफ्यात इलेक्ट्रीक बस उतरवण्यात येत आहेत. त्यानुसार या बसेससाठी कंत्राटही देण्यात आले असून, लवकरच या बसेस महामंडळाच्या मुंबईतील मुख्यालयाकडे येणार आहेत. तेथून राज्यातील प्रमुख शहराला या बसेसचे वाटप होणार आहे. औरंगाबादेत वीस बसेस येणार असल्याने त्यासाठी विभाग नियंत्रक कार्यालयाच्या मागील बाजुला चार्जिंग स्टेशन उभारले जात आहे. या चार्जींग स्टेशनमध्ये 15 बसेस चार्जिंग होतील अशी व्यवस्था आहे. एक बस चार्जिंगसाठी किमान सहा तासांचा अवधी लागणार आहे.

 

सध्या औरंगाबाद-पुणे मार्गावर मार्गावर 18 शिवशाही बस धावत आहेत. त्या बसेस बंद करुन प्रवाशांना आरामदायी इलेक्ट्रिक बसेस या मार्गावर सुरु केल्या जाणार आहेत. पुणे आगाराच्याही किमान 20 इलेक्ट्रिक बसेसही याच मार्गावर धावणार आहेत. जून अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही सेवा सुरु होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment