सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास साताऱ्यातील रायगाव फाटा येथे झालेल्या तिहेरी अपघातात सहा जखमी झाले आहेत. तर दोनजण गंभीर जखमी आहेत. सुदैवाने घटनास्थळी कोणी दगावले नाही, मात्र इनोव्हा गाडीचे मोठे नुकसान झाले होते.रायगाव फाटा येथे आयशर, इनोवा कार आणि कंटेनर या तीन वाहनांचा जोरदार अपघात झाला.
सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या आयशर ट्रक मध्ये बिघाड झाल्यामुळे हायवे लगत हा ट्रक उभा केला होता. त्यावेळी पाठीमागील दिशेने आलेल्या कोल्हापूर येथील ईनोव्हा कार चालकाने गाडीचे स्पीड कमी केल्यामुळे पाठिमागुन भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने या दोन्ही वाहनांना जोरदार धडक दिली.
या अपघातात आयशर ट्रक चालक आणि कंटेनर चालक दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मोठ्या वाहनांच्या या विचित्र तिहेरी अपघातामुळे हायवेवर ट्रॅफिक जाम झाले होते. पोलिसांनी या स्थळावरील सर्व वाहतुक सर्विस मार्गावरुन वळविण्यात आली होती. तिन्ही वाहनांचे अपघातात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अपघाताची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा