औरंगाबाद | सराफा बाजारात खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या पर्स लांबवत सोन्याचे दागिने आणि कापड बाजारपेठेतून कपडे चोरलेल्या बुरखा गँगमधील आठ महिलांना सिटीचौक पोलिसांनी अखेर अटक केली आहे. या बुरखा गँगकडून पोलिसांनी तब्बल अडीच लाखांचे दागिने आणि कपडे हस्तगत केले आहेत. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.
गेल्या अनेक दिवसांपासून बुरखा गँगने सिटीचौक पोलिसांच्या नाकात दम करून सोडला होता. सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद असताना देखील ही गँग पोलिसांच्या हाती लागत नव्हती. या बुरखाधारी महिला शहरातील विविध भागात मार्केटमध्ये फिरून चोरी करत होत्या. अखेर सिटीचौक पोलिसांना बुरखा गँगमधील आठ महिलांना अटक करण्यात यश आले आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी सायरा बशीर शेख (वय 55) रा. शंभुनगर, चाणक्यपुरी या सोने खरेदी व दुरूस्तीसाठी सराफा बाजारात आल्या होत्या. त्यावेळी त्यांची दागिने असलेली पर्स लांबविण्यात आली होती. याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी पवार, दुय्यम निरीक्षक अशोक भंडारे, सहायक पोलीस निरीक्षक एम. एम. सय्यद, उपनिरीक्षक काशीनाथ महांडुळे, खैरनार, पोलीस नाईक शेख गफार, संजय नंद, तायडे, पटेल, देशराज मोरे यांच्यासह महिला पोलीस कर्मचारी यांनी बुरखा गँगचा मिसारवाडी भागात शोध घेतला. त्यावेळी दोन बुरखाधारी महिला यांना पकडण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवताच दोन्ही महिलांनी सराफा, रंगारगल्ली, कपडा मार्केटमधून सोन्याचे दागिने आणि कपडे चोरल्याची कबुली दिली. तसेच यात आणखी सहा महिला साथीदार असल्याचेही सांगितले. त्यावरुन किराडपुरा, रोशनगेट, काचीवाडा, शहाबाजार या भागातून इतर सहा महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, साड्या व कपडे असा अडीच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. या पुढील तपास उपनिरीक्षक बी. ई. मुजगुले आणि जमादार शेख महेबुब करत आहेत.