तहसिलदारांचे परिपत्रक : माण तालुक्यात वाळू, मुरूम व मातीसह गौण खनिज उत्खननास मनाई

दहिवडी | तहसील कार्यालय माण येथून प्रसिद्द झालेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार माण तालुक्यात तहसीलदार यांनी शासन निर्णयानुसार वाळू, मुरूम व माती यासह इतर गौण खनिजांचे विनापरवाना उत्खनन व वाहतूक केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. याबाबत दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशाचे परिपत्रक जारी केले आहे.

माण तालुक्यात याआधी तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी खडी क्रशर आणि वाळू चोराविरोधात धडक कारवाया केलेल्या आहेत. यांमुळे अनेकांचा थरकाप तसेच झोप उडाली आहे, तरीही चोरीछुपे वाळू, मुरूम, तसेच इतर गौणखनिज यांची वाहतूक व उत्खनन सुरूच असल्याने तहसीलदार रिचर्ड यानथन यांनी विनापरवाना उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रशासनाने अवैध मार्गावर टाच आणण्यासाठी हे परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकामुळे प्रशासन अॅक्शन मोडवर असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाच्या कडक भूमिकेमुळे वाळू, मुरूम व माती चोरट्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.