दिड महिण्याच्या बाळांना दिलं मुदत संपलेलं औषध; ‘या’ सरकारी दवाखान्यात घडला प्रकार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दीड महिन्याच्या बाळांना रक्तवाढीसाठी दिलेल्या औषधाची मुदत संपल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी समोर आला. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार करताच आरोग्य विभागाने या औषधांच्या बाटल्या परत घेतल्या. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

संजयनगर परिसरातील अंगणवाडीतून लहान मुलांसाठी रक्तवाढीचे औषध दिले जाते. लहान मुलांना डोस देण्यासाठी आलेल्या काही पालकांना या औषधाच्या बाटल्या देण्यात आल्या. पालकांनीही औषधाची मुदतीची खात्री केली नाही. काही मुलांना ही औषधे दिल्यानंतर त्यांना उलट्या झाल्या. पालकांनी संपर्क साधून तक्रार केली. औषध बाटलीची मुदत नोव्हेंबरपर्यंत होती. या औषधाचे वाटप २८ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. हा प्रकार गंभीर आहे. याबाबत आरोग्य विभागाकडे तक्रार केली.

महापालिकेच्या आरोग्य विभागात मुदत संपलेल्या औषधांचा मोठा साठा असण्याची शक्यता आहे. हा प्रकार लहान मुलांच्या जीवाशी खेळणार असल्याने आयुक्तांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. दरम्यान, याबाबत आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता नोव्हेंबरची मुदत असलेल्या तीन बाटल्यांचे वाटप करण्यात आल्याचे कबुल करण्यात आले. या तीनही बाटल्या परत घेतल्या आहेत. त्या सीलबंद असून औषध मुलांना दिले गेलेले नाही. आरोग्य सेविकांनी मुलांच्या घरी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. मुलांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Comment