नाराज शेतकऱ्यांचा भाजपला दणका! हरियाणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दारुण पराभव

चंदीगढ । केंद्रातील मोदी सरकाराच्या कृषी कायद्यांच्या विरोधातील शेतकरी आंदोलनाने पंजाब, हरियाणातील वातावरण तापलेले आहे. याचा थेट फटका भाजपाला हरियाणातील नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकामध्ये बसल्याचे दिसत आहे. येथील दोन नगरपरिषदा, तीन नगरपालिका भाजपाला गमवाव्या लागल्या आहेत.

हरियाणामध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल आज लागलेआहेत. तीन नगरपालिका निवडणुकीत भाजपा-जेजेपी आघाडीला मोठा झटका लागला आहे. तिन्ही ठिकाणी अध्यक्षाची निवडणूक अपक्ष उमेदवार जिंकले आहेत. हिसारच्या उकलाना, रोहतकच्या सांपला आणि रेवाडीच्या धारुहेडामध्ये अपक्षांनी बाजी मारली आहे.

उकलानामध्ये अपक्ष उमेदवार सुशील साहू यांनी भाजपाचे उमेदवार महेंद्र सोनी यांना पाडले आहे. सांपला नगरपालिकेत भाजपाच्या उमेदवार सोनू यांना अपक्ष उमेदवार पुजा यांनी मोठ्या मतफरकाने हरविले आहे. महत्वाचे म्हणजे पूजा या काँग्रेसच्या कार्यकर्त्या आहेत. परंतू काँग्रेस याठिकाणी पक्षाच्या निशानीवर लढली नव्हती. यामुळ पूजा या अपक्ष ठरल्या होत्या. धारुहेडामध्येही अपक्ष उमेदवार कंवर सिंह जिंकले आहेत.

अंबालामध्ये शक्ती राणी जिंकल्या आहेत. त्यांनी भाजपाच्या उमेदवार डॉ. वंदना शर्मा यांना हरविले आहे. राणी यांना 37604 मते मिळाली, तर शर्मा यांना 29520 मते मिळाली. काँग्रेस चौथ्या नंबरवर राहिली. सोनीपतमध्ये काँग्रेसचे उमेदवार निखिल मदान यांनी भाजपाच्या लिलत बत्रा यांना 13818 मताधिक्याने हरविले आहे. फक्त एकाच ठिकाणी भाजपा जिंकली आहे. पंचकुला नगरपरिषदेमध्ये भाजपाचे कुलभूषण गोयल यांनी विजय मिळविला आहे. त्यांनी काँग्रेसचे उपिंदर अहलुवालिया यांना पराभूत केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

You might also like