शेतकरी आंदोलनाने मोंदीचे मंत्री बिथरले; खलिस्तान, पाकिस्ताननंतर आता केला ‘हा’ आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या १६ दिवसांपासून शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत. आधी पंजाब, हरियाणानंतर शेतकरी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. यादरम्यान, मोदी सरकारवर दबाव वाढत असून मोदी सरकारचे मंत्रीगण या आंदोलनावर विविध गंभीर आरोप करताना दिसत आहेत. कधी शेतकऱ्यांना खलिस्तान समर्थक, तर कधी याआंदोलनामागे थेट चीन-पाकिस्तानचा हात असल्याचा निराधार आरोप करत आंदोलनाची धार कमी करण्याचा मंत्र्यांनी प्रयन्त केला आहे. (farmar protest)

मात्र, आता शेतकऱ्यांसोबत चर्चेच्या बैठकीत त्यांच्याशी चर्चा करणारे मोदी सरकारचे बडे मंत्री पीयुष गोयल यांनी गंभीर आरोप केले आहेत. शेतकरी आंदोलन हे आता डावे आणि माओवाद्यांच्या हाती गेले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. डाव्या विचारसरणीच्या संघटना आपला अजेंडा चालवू इच्छित आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रलोभांना बळी पडू नये आणि सरकारसोबत चर्चा करावी. शेतकऱ्यांसाठी सरकारचे दरवाजे प्रत्येक मुद्द्यावर चर्चेसाठी खुले असल्याचे गोयल म्हणाले.

रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी एनबीटीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे आरोप केले आहेत. वामपंथी संघटना शेतकऱ्यांना भडकवत आहेत. सरकार तिन्ही कृषी कायदे मागे घेणार का, या प्रश्नावर गोयल म्हणाले की, या कायद्यांमुळे देशातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. काही मोजक्या लोकांसाठी संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचे नुकसान करता येणार नाही.

शेतकरी कायद्याच्या कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करू इच्छित असतील तर त्यांनी सरकारकडे यावे. सरकार यासाठी तयार आहे. जिथपर्यंत एमएसपीचा प्रश्न आहे, लोकसभेपासून सरकारपर्यंत शेतकऱ्यांना पूर्ण आश्वासन दिले आहे की एमएसपी मागे घेतला जाणार नाही. एमएसपी सुरुच राहणार आहे. यंदा २३ टक्के जास्त शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करण्यात आली. मला पूर्ण विश्वास आहे की, शेतकरी देशहिताच्या या कायद्याला समजून घेतील. त्यांना या कायद्यातून सर्व प्रकारच्या बंधनांतून मुक्ती मिळणार आहे. जर त्यांना त्यांच्या उत्पादनाची किंमत अन्य ठिकाणी जास्त मिळत असेल तर ते तिथे जाऊन विक्री करू शकतात.

आज चक्काजाम
दरम्यान, शेतकरी आंदोलनाच्या १६ व्या दिवशीही कुठलाही तोडगा निघू शकला नाही. तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत यासाठी शेतकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. तर उद्या शनिवारी देशभरातील टोल नाके मुक्त करण्याचा आणि दिल्ली-जयपूर व दिल्ली-आगरा महामार्ग अडविण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यासाठी पंजाबच्या विविध भागांतून हजारो शेतकरी दिल्लीकडे निघाले आहेत. तसेच दिल्ली, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, राजस्थानसह सर्व राज्यांत टोल नाके व रस्ते बंद करण्याचे त्यांनी ठरविले आहे. काही ठिकाणी रेल रोकोही केला जाईल, असे कळते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment