वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी शेतकरी सरसावले

औरंगाबाद : महाकृषी ऊर्जा अभियानात कृषिपंपांच्या थकबाकीत तब्बल 66 टक्के सवलत मिळवत औरंगाबाद परिमंडलातील 48 हजार 327 शेतकऱ्यांनी 25.65 कोटींचा भरणा केला आहे. या महाकृषी ऊर्जा अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे वीजबिलांतून थकबाकीमुक्त होण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांसह औरंगाबाद परिमंडलातील शेतकऱ्यांनीही पुढाकार घेतला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारातून वीजबिलांच्या वसुलीमधील तब्बल 66 टक्के रकमेचा निधी हा संबंधित ग्रामपंचायत व जिल्ह्यातील कृषी वीजयंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी वापरण्यात येणार आहे.

या महत्त्वाच्या तरतुदीमुळे शेतकरी‍ बिल भरण्यास प्रतिसाद देत आहेत. मागील वर्षी 1 एप्रिल 2020 पासून जमा होणाऱ्या वसुलीच्या रकमेची कृषी आकस्मिक निधी म्हणून स्वतंत्र नोंद ठेवली जात आहे. औरंगाबाद परिमंडलाच्या कृषी आकस्मिक निधीमध्ये चालू व थकीत वीजबिलांच्या भरण्यातून आतापर्यंत एकूण 26 कोटी 35 लाख रुपये जमा झाले आहेत. त्यापैकी 66 टक्के रक्कम म्हणजे तब्बल 17 कोटी 40 लाख रुपयांचा निधी संबंधित ग्रामपंचायत व जिल्ह्यातील कृषी वीजयंत्रणेच्या विविध कामांसाठी वापरण्यात येणार आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.

या अभियानात कृषिपंपांच्या वीजबिलापोटी औरंगाबाद जिल्ह्यातील 30 हजार 440 शेतकऱ्यांनी 16 कोटी 56 लाख तर जालना जिल्ह्यातील 17 हजार 887 शेतकऱ्यांनी 9 कोटी 9 लाख असे औरंगाबाद परिमंडलात 48 हजार 327 शेतकऱ्यांनी 25 कोटी 65 लाख रुपये भरले आहेत. कृषी आकस्मिक निधीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यास 11 कोटी 34 लाख तर जालना जिल्ह्यास 6 कोटी 4 लाख रुपये उपलब्ध झाले आहेत. नवीन उपकेंद्र, वितरण रोहित्र, वीजजोडण्या, कृषी वाहिन्या आदींच्या कामांसाठी या निधीचा वापर होणार आहे. संबंधित ग्रामपंचायत व जिल्ह्यातील वीजविषयक विविध कामांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे तर अनेक ठिकाणी कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.

You might also like