व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सहकार मंत्र्याच्या घरावर शेतकरी संघटनेचे जुलैमध्ये धरणे आंदोलन : रघुनाथदादा पाटील

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील सहकारी बँका अणि पतसंस्था शेतकऱ्यांकडून बेकायदेशीरपणे व्याज अकारणी करून कर्ज वसूल करत आहेत. त्याच्यावर कारवाई होत नाही. या मुद्यासह शेतकरी आत्महत्या प्रश्नी सहकार मंत्र्याच्या घरावर शेतकरी संघटना जुलैमध्ये धरणे आंदोलने करणार आहे. त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केले.

शेतकरी संघटनेची जाहिर सभा कराड तालुक्यातील विंग, काले येथे झाली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष विजय पाटील, महिला आघाडी तालुकाध्यक्षा रोहिता कदम, जिल्हा संघटक अशोकराव पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तात्या पाटील, राजासाहब पटाण, शांताराम बाबर, अॅड. पोपटराव देसाई, उत्तमराव खबाले, तंटामुक्ती अध्यक्ष आनंदराव खबाले, मोहन बाबर, प्रशांत कदम, विनायक पाटील यासह शेतकरी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, आज महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांना एआरफी फक्त 2900 रूपये मिळत आहे. गुजरातमध्ये 4 हजार 500 रूपये तर उत्तर प्रदेश राज्यात 3 हजार 400 रूपये मिळतो. महाराष्ट्रातील साखर सम्राट शेतकऱ्यांकडून वेटबिगारी करून घेत आहेत. हे बंद झाले पाहिजे. त्यासाठी दोन साखर कारखान्यातील हवाई अंतराची अट रद्द झाली पाहिजे. तरच इथल्या ऊस उत्पादकाना 5 हजार रूपये दर मिळेल. शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांचे 2002 दरम्यान मिरज येथे झालेल्या अधिवेशनानंतर आम्ही आमच्या गावातील शेती पंपाचे व घरगुती विजबील भरत नाही. कनेक्शन तुटत नाही. उलट आमचे पैसे महावितरणकडे शिल्लक आहेत. असेही ते म्हणाले. स्वातंत्र्य पूर्व काळात शेतकरी आत्महत्या कधी झाल्या नाहीत. मात्र आपणच निवडूण दिलेले स्वकीय लोक सत्तेत आले अन् शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांच्या न्याय-हक्कासाठी जुलैमध्ये सहकार मंत्र्याच्या घरावर शेतकरी संघटना धरणे आंदोलन करणार आहे. त्या अंदोलनात तुमच्या परिसरातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. असे आवाहन यावेळी त्यांनी केले. शांताराम बाबर, अॅड. पोपटराव देसाई, रोहिता कदम, विजय पाटील यांची मनोगते यावेळी झाली. उत्तमराव खबाले यांनी आभार मानले.